अमोलसिंह चंदेल । शिराढोण
यंदाच्या खरीप हंगामासाठी परिसरातील बहूतांश शेतक-यांनी अत्याधुनिक ट्रॅक्टरच्या यंत्राव्दारे पेरणी पुर्व मशागत केल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे तिफण, तिफणीचे चाडे, शेतक-यांच्या कमरेला बांधलेली बि-बियाणे-खतांची पिशवी व तिफणीवरील बैलजोडी हे चित्र आता दुर्मिळ होत असल्याचे दिसून येत आहे.
खरीप हंगाम यासाठी शेतकरी पेरणीपूर्व जमीनीची मशागत करून पेरणीचे अवजारे, बि-बियाणे, खत,याची जुळवाजुळव करून ग्रामीण भागात आपली परंपरागत अवजारे दूरूस्त करण्यासाठी सर्व शेतकरी सुताराकडे गर्दी करत असत. परंतू पारंपारिक शेती मशागत तसेच पेरणीसाठी लागणारी अवजारे आता लोप पावल्याचे दिसून येत आहे. पारंपारिक अवजारांची अवस्थाही सध्या वाईट दिसून येत आहे. शेतकरी मोठा असो किंवा छोटा त्यांच्याकडे असणा-या पारंपारिक अवजारांना अवकळा आल्याचे दिसते. कारण असे की, पेरणीसाठीची कामे बैल जोडीने बळीराजा 4 दिवस करत होता.त्या शेतीविषयक कामांना सध्या आधुनिक यंत्राने केवळ 4 तास लागतात. सध्या अधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आज शेतकरी शेती करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. पुर्वी शेतकरी हे शक्यतो शेतीसाठी लाकडी अवजारे वापरत असत. परंतू सध्या हाच शेतकरी लोखंडी कुळव, कोळपे, नांगर, तिफण अशी अवजारे वापरताना दिसत आहे. सध्या बळीराजा नवीन प्रकारची रासायनीक खत, बि-बियाणे, किटकनाशक तसेच पाणी देण्यासाठी तुषार सिंचन, ठिबक वापरून कमीत कमी क्षेत्रात व कीमत कमी वेळात जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल यासाठी शेतकरी प्रयत्नशिल असल्याचे दिसून येते. पुर्वी शेतात बैलजोडी, तसेच लाकडी अवजारे दिसून येत होती परंतू त्यांची जागा आता ट्रॅक्टरने घेतल्याचे दिसून येते. आधुनिक व प्रयोगशील शेतीमुळे उत्पादन मिळत असल्याने बागायती शेती मशागतीसोबत कोरडवाहूसाठीही आता आधुनिक अवजारांचा उपयोग केला जात आहे. शेतक-यांकडे असलेली बैलजोडी आता नावापूरतीच राहते की काय अशी
शक्यता आहे. आजच्या अधुनिक युगात सर्वच क्षेत्रामध्ये बदल होत आहेत.अन्नधान्य, चारा, वैरण व अन्य साहित्याची वाहतूक करण्यासाठी बैलजोडी, बैलगाडीचा वापर होत असे. परंतू सध्या त्यासाठीही वाहनांचा वापर सुरू झाला आहे.
कमी वेळेत जास्त काम:
बदलत्या काळात कमी वेळेत जास्तीत जास्त काम करण्याचे सूत्र ट्रॅक्टरच्या माध्यमातून खरे होताना दिसून येत आहे. ट्रॅक्टरव्दारे शेतीची मशागत करण्याकडे शेतक-यांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. लहानशा गावांमध्येही छोट्या शेतक-यांच्या घरासमोर ट्रॅक्टर दिसून येत असल्याने यांत्रिक शेतीला दिले जाणारे महत्व यातून दिसून येत आहे.