आरंभ मराठी / धाराशिव
माध्यमिक शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थ्याला किरकोळ कारणावरून शाळेत काठीने अमानुषपणे मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेत शिक्षकांनी विद्यार्थ्याला 18 ते 20 वेळा काठीने संपूर्ण अंगावर बेदम मारहाण केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या पालकांनी मारहाण करणारे शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, धाराशिव शहरातील जाधववाडी रोडवरील श्री श्री रविशंकर विद्यामंदिर येथे एका विद्यार्थ्याला काठीने मारहाण केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत साईरामनगर, धाराशिव येथील गोपाळ नारायण कोळी (वय ४०, व्यवसाय) यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा १३ वर्षीय मुलगा मनीषराज गोपाळ कोळी याला शाळेची वर्गाची वही का आणली नाही, या कारणावरून शिक्षक प्रफुल जाधव यांनी काठीने मारहाण केली.
या मारहाणीत विद्यार्थ्याच्या उजव्या खांद्यावर, डाव्या हातावर, पाठीवर व डाव्या पिंडरीवर गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्याला मानसिक धक्का बसला असून पालकांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. सदर प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१) आणि बाल न्याय (काळजी व संरक्षण) कायदा २०१५ मधील कलम ७५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मारहाण करणारे शिक्षकाने यापूर्वीही या विद्यार्थ्याला दोन वेळेला अमानुषपणे बेदम मारहाण केल्याचे विद्यार्थ्याच्या पालकांनी सांगितले. तसेच किरकोळ कारणावरून वारंवार शाळेमध्ये विद्यार्थ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचाही आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, पुढील तपास सुरू आहे. शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दराडे यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे.









