नालीच्या कामाचा दर्जा नाही, डांबरी रस्ता उखडला,नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा सुरूच,चार वर्षांपूर्वी मंजूर झालेले साडेपाच कोटी खर्च होईनात, विकासाचा वेग कसा वाढणार?
प्रतिनिधी / धाराशिव
शहरातील रेल्वे स्टेशन जिजाऊ नगर रस्त्याची दुर्दशा संपण्याचे नाव घेत नाही. पावसाळ्यात प्रचंड हाल सहन करूनही नागरिकांची समस्या समजू न शकलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भावना बोथट झाल्या आहेत. त्यामुळेच 15 दिवसांपूर्वी खासदार ओमराजे आणि आमदार कैलास पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदाराला कडक शब्दांत सुनावले, तसेच काम पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार 31 ऑक्टोबर डेडलाईन दिली. ही मुदत संपण्यासाठी 20 दिवस उरले आहेत. मात्र अजून कामाला सुरुवात देखील झालेली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींना मुदत देऊनही कामाबद्दल गांभीर्य नसलेले अधिकारी किती निर्ढावले आहेत,याचा अंदाज येतो.
भुयारी गटार योजनेच्या कामामुळे धाराशिव शहरातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. नागरिकांची ओरड झाल्यानंतर आणि माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर काही भागात रस्त्यांची दुरुस्ती झाली. पण दरम्यानच्या काळात पाऊस थांबल्याने नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्या आणि नगर पालिकेने दुरुस्ती थांबवली.परतीचा मोठा पाऊस झाल्यास नागरिकांचे अजून हाल होणार आहेत. मात्र धाराशिव शहरातील नागरिक अत्यंत संयमी असल्याचा गैरफायदा प्रशासन घेत आहे. किंबहुना या संयमातून नागरिकांना स्वतःच्या हक्कांचा, जाणिवांचा विसर पडत आहे. स्टेशन रोड, जिजाऊ नगर रस्त्यासाठी 4 वर्षांपूर्वी आमदार कैलास पाटील यांच्या प्रयत्नातून साडेपाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे.मात्र नगर पालिकेने शहराला जणू विकासाच्या मार्गावर नेणारी भुयारी गटार योजना राबविण्याचा घाट घातला. या योजनेच्या कामामुळे रस्त्याचे काम रखडले होते. हे काम पूर्ण करून 5 महिने झाले तरी रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नाही. प्रचंड हाल सहन करुनही भावना बोथट झालेल्या नागरिकांचा आवाज बांधकाम विभागापर्यंत पोहोचलाच नाही.निवडक नागरीक आंदोलन,पाठपुरावा करत आहेत, मात्र, उर्वरित नागरिक मुकाटपणे सहन करत खड्ड्याच्या रस्त्यातून मार्ग शोधत आहेत. तर याच संयमाचा अधिकारी आणि ठेकेदार गैरफायदा उठवत आहेत.मार्च महिन्यात रस्ता उखडून टाकण्यात आला होता. अजूनही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. काही नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर खासदार ओमराजे आणि आमदार कैलास पाटील यांनी गेल्या महिन्यात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची रस्त्याच्या कामासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत नागरिकांची रस्त्यामुळे होणारी समस्या आणि कामातील दिरंगाईबद्दल खडसावल्यानंतर अधिकाऱ्यांनी चुक मान्य करत 31 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी मुदत मागितली. 31 तारखेपर्यंत स्टेशन रोडचे काम पूर्ण करण्यात येईल असा शब्द दिला.ही मुदत सप्टेंबर महिन्यात दिलेली होती. मात्र मुदतीच्या प्रमाणात कामाला सुरुवात देखील झालेली नाही.त्यामुळे अधिकारी ही डेडलाईन तरी पाळणार आहेत का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
डांबरीकरण उखडले,नालीच्या कामाचा सुमार दर्जा
स्टेशन रस्त्याच्या कामाला साडेपाच कोटी रुपये मंजूर आहेत. यात 1100 मीटर काँक्रीट रस्ता, 1 किलोमीटर डांबरीकरण आणि 800 मीटर नालीच्या कामाचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात शेवटच्या बाजूला डांबरीकरण करण्यात आले. मात्र या रस्त्यावरून वाहने गेल्यानंतर रस्त्याची अवस्था पूर्वीपेक्षा खराब झाली. या कामाकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. काही नागरिकांनी तक्रारी केल्या मात्र पुढे कार्यवाही झाली नाही.उर्वरित नियोजित सिमेंट रस्त्याच्या बाजूला नालीचे काम सुरू आहे. या कामावर पाणी मारले जात नाही,सुमार दर्जाचे काम सुरू असताना अधिकारी डोळेझाक करत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव आहे की अधिकारी-ठेकेदारांच्या संगनमताने बोगस काम केले जात आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.
कामाची मुदत संपली, फेरनिविदा काढा
सिमेंट रस्त्याच्या कामासाठी 15 महिन्यांची मुदत होती. ही मुदत संपली असून, अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे ठेकेदार काम करण्यासाठी सक्षम नाही, असे समजून फेरनिविदा काढावी अशी मागणी केली जात आहे. कामाला सुरुवात करण्यासाठी अजूनही अनेक अडथळे आहेत. त्यासाठी बांधकाम विभागाचा पाठपुरावा नाही. रस्त्यावर विद्युत खांब, डीपी आणि अतिक्रमणे आहेत. हे काढण्यासाठी बांधकाम विभागाचे अधिकारी मोजणी आणि महावितरण विभागाकडे पाठपुरावा करताना दिसत नाहीत. त्यामुळे महिनाभराच्या कामाला अजून वर्ष लागणार हे निश्चित.