प्रतिनिधी / धाराशिव
धाराशिवची बालकीर्तनकार हभप राजश्री राजाराम ढवळे हिने आषाढी एकादशी निमित्त सोलापूरच्या कै. वि. मो. मेहता शाळेत हरिकीर्तन सादर करत विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे शाळेने २७ जून रोजी कीर्तन सोहळा आयोजित केला होता.यावेळी कु. राजश्री ढवळे हिने सुश्राव्य कीर्तन सादर केले आणि विद्यार्थी हरिनामात तल्लीन झाले. काही भजन सादर करत ढवळे हिने उपस्थितांची मने जिंकली. तर विद्यार्थ्यांनीही भजनात सहभाग नोंदवला.
आई-वडिलांचीही भक्ती करा
ढवळे हिने आपल्या कीर्तनातून संत तुकारामांच्या अभंगावर निरूपण केले. परमेश्वराच्या भक्ती बरोबरच आई-वडिलांवरही तितकीच भक्ती व प्रेम करा, तसेच निरनिराळ्या उदाहरणांद्वारे साधन भक्ती, भाव भक्ती, प्रेम भक्ती यांचे उत्कृष्ट असे निरूपण केले. तसेच तिने गुरुसेवेचा महिमा सांगून स्वतःच्या कर्तृत्वावर जगायला शिका, सूर्यासारखे तेजस्वी व सिंहासारखे धैर्याने लढा, असा संदेश विद्यार्थिनींना दिला.या कार्यक्रमास शालेय समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन व त्यांच्या सुविद्य पत्नी मा. सौ. सुमेधा पटवर्धन आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रुती बागेवाडी यांनी केले. पर्यवेक्षिका सुस्मिता तडकासे, शिक्षक -शिक्षकेतर वृंद,राजाराम ढवळे व सुवर्णा ढवळे, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.श्री. विठ्ठलाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.