कपडे,फराळ साहित्य वाटप
आरंभ मराठी / धाराशिव
आपत्तीने भूमी हादरली, पण माणसाचा आत्मविश्वास डगमगला नाही, या एका वाक्यात साडेसांगवीकरांच्या जिद्दीचे सार दडले आहे. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या या गावात आज पुन्हा आशेचे दिवे पेटले. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवारासह पूरग्रस्त साडेसांगवी ग्रामस्थांच्या सान्निध्यात दिवाळी साजरी करून आनंद द्विगुणित केला.
गावातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातील हनुमान मंदिरासमोर दिवाळीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना स्कूल किट व फटाके, तर ग्रामस्थांना दिवाळी भेटवस्तू आणि आकाशदिवे वाटण्यात आले. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून पालकमंत्र्यांनी भावनिक होत, साडेसांगवी पुन्हा फुलवणं ही आमची जबाबदारी आहे,असा निर्धार व्यक्त केला.
सरनाईक म्हणाले, साडेसांगवी हे केवळ एक गाव नाही, तर शेतकऱ्यांच्या श्रमांची आणि आत्मविश्वासाची भूमी आहे. पुराच्या काळात या गावाचा पूल तीन ते चार दिवस पाण्याखाली होता. आता ग्रामस्थांना सोयीसाठी दोन पूल आणि अडीच किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात येईल. ही तीनही कामे एका वर्षात पूर्ण करून दाखवू; निधीची कमतरता पडू देणार नाही.
या वेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक सौ. रितू खोखर तसेच शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.