ठेवींपेक्षा संस्थेचा स्वनिधी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार
आरंभ मराठी / धाराशिव
विश्वासातून प्रगतीकडे हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या आणि आर्थिक,सामाजिक क्षेत्रात नावलौकीक मिळवलेल्या श्री.सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीला गेल्या आर्थिक वर्षात 3 कोटी 64 लाख रुपयांचा नफा झाला असून, यातून सभासदांना 10 टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा श्री.सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केली आहे. ठेवींपेक्षा स्वभाग भांडवल वाढविण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. प्रमुख अतिथी म्हणून प्रगती नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, श्री विठ्ठल सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील, विधिज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष रवींद्र कदम, मधुकरराव जाधव, श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट सोसायटीचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी, नागेश नाईक, अॅड.नितीन भोसले, योगेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणाले, सिध्दीविनायक मल्टीस्टेट सोसायटी ही 11 शाखांमार्फत ग्राहकांना बँकिंग सेवा पुरवित असून 26 हजार सभासद बँकेच्या सेवेने समाधानी आहेत. मागील वर्षात संस्थेला 3 कोटी 64 लाख रुपयांचा नफा झाल्यामुळे सभासदांना या आर्थिक वर्षात 10 टक्के लाभांश वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर संस्थेचा स्वनिधी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी संचालक मंडळाला केले.
सभेत उपस्थित मान्यवरांनीही संस्थेच्या कार्याचे अभिनंदन करुन संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या कार्यकुशलतेचे कौतुक केले. बँकेचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी यांनी अहवाल वाचन केले. सभेत मांडलेल्या ठरावांना सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक राजकुमार जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रतिक देवळे यांनी तर आभार देवीदास कुलकर्णी यांनी मानले. वार्षिक सर्वसाधारण सभेस सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.