उमरगा, तुळजापूरसह कळंब,भूम शहरात सभा, धराशिवमध्ये मुक्काम
मराठा आंदोलनामुळे स्थगित झाला होता दौरा
आरंभ मराठी / धाराशिव
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंधरा दिवसांपूर्वी स्थगित झालेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा धाराशिव जिल्हा दौरा गुरुवार आणि शुक्रवारी निश्चित करण्यात आला आहे.त्यांच्या दौऱ्याचे आयोजन सुरू झाले आहे.
पूर्वीच्या नियोजनानुसारच लातूर जिल्ह्यातून औसामार्गे त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल. गुरुवारी दुपारी उमरगा येथे सभा,त्यानंतर लोहारामार्गे ते तुळजापुरला येतील.शहरात त्यांची सभा होईल,त्यानंतर कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे आशीर्वाद घेऊन ते धाराशिव शहरात मुक्कामी येणार आहेत.
दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ते ढोकीमार्गे कळंबकडे रवाना होतील. कळंब येथील सभेनंतर येरमाळा,बार्शीमार्गे परंडा येथे जाणार आहेत.माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या निवासस्थानी भोजन करून पुढे भूम येथील सभेला संबोधित करतील.त्यानंतर ते छत्रपती संभाजी नगरकडे जाणार आहेत.त्यांच्या दौऱ्याचे जोरदार नियोजन सुरू आहे.
ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात झंझावाती दौरा आयोजित केला आहे. त्यांनी मराठवाड्यात वेगवेगळ्या तालुक्यात दौऱ्याचे नियोजन केले आहे. ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहीलेल्या खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना अधिक बळ देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे यांचा हा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना भेटी
धाराशिव जिल्ह्यातील सगळ्याच म्हणजे आठही तालुक्यात त्यांचा दौरा निश्चित झाला आहे. गुरुवार आणि शुक्रवार, असा दोन दिवसांचा त्यांचा जिल्हा दौरा असून,त्यांच्या दौऱ्याने पक्षाला पुन्हा एकदा ऊर्जितावस्था मिळेल.
कोणावर निशाणा..? दौऱ्याकडे लक्ष
शिवसेना फुटीनंतर खासदार ओमराजे तसेच आमदार कैलास पाटील यांनी ठाकरे कुटुंबाची साथ सोडली नाही. जिल्ह्यातील दोन आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले तरी पक्षाला उभारी देण्यासाठी खासदार तसेच आमदारांनी जिल्हा पिंजून काढला आणि पक्षाची ताकद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पक्षाच्या फुटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा असून, या दौऱ्यात ते विरोधकांचा कसा समाचार घेतात, त्यांचा कोणावर निशाणा असणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.