‘आरंभ मराठी’ने दिले होते सर्वप्रथम वृत्त,
ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे
आरंभ मराठी / धाराशिव
एक नेता, शेकडो कार्यकर्त्यांसह सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार, अशा आशयाचे वृत्त दैनिक आरंभ मराठीने प्रसिध्द केले होते. मुंबईत हा पक्ष प्रवेश होणार होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धाराशिव जिल्हा निश्चित होणार असल्याने पक्ष प्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. अखेर हा प्रवेश शनिवारी परंडा येथे होणार असून, या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या कळंब येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. हा नेता म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख तथा कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे होय. त्यांच्या शिंदे गटातील पक्ष प्रवेशाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
शिवाजी कापसे हे उबाठा गटाचे तालुका प्रमुख आहेत तसेच कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. गेल्या 35 वर्षापासून त्यांची कळंब नगर पालिकेवर सत्ता आहे. कळंब शहरासह तालुक्यात त्यांचा प्रभाव आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटात ते नाराज होते. गेल्या अनेक महिन्यांपासून कापसे पक्षंतराच्या उंबरठयावर होते.यासंदर्भात आरंभ मराठीने सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांचा पक्ष प्रवेश लांबणीवर पडला होता. त्यांच्या पक्ष प्रवेश मुंबईत घेण्याचे नियोजन होते. मात्र पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या पुढाकारातून परंडा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत समारंभ आयोजित करण्यात येणार होता. या कार्यक्रमात प्रवेश व्हावा,यासाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणारा पक्ष प्रवेश पुढं ढकलण्यात आला होता. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परंडा येथे येत आहेत. या कार्यक्रमात शिवाजी कापसे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. शेकडो गाड्यातून कळंब तालुक्यातील कार्यकर्ते या कार्यक्रमाला जाणार आहेत. त्याची तयारी सुरू झाली आहे.
–
राजीनामा सत्र सुरू
कळंब शहरातील शिवसेना उ.बा.ठा.गटातील पदाधिकाऱ्यांनी बुधवारी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामा दिले आहेत. कळंब बाजार समितीचे सभापती शिवाजी आप्पा कापसे यांच्या भविष्यात होणाऱ्या राजकीय भूमिकेला अनुसरून शहरातील उ.बा. ठा. गटाचे पदाधिकारी यांनी सामुहिक राजीनामे संपर्क प्रमुख व जिल्हाप्रमुख यांच्याकडे पाठवले आहेत. यामुळे उबाठा गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शिवाजी कापसे हे तालुकाप्रमुख असून, बाजार समितीचे सभापती आहेत.ते धाराशिव विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.बुधवारी राजीनामे देणाऱ्यामध्ये अजित गुरव, जिलानी कुरेशी, विजय पारवे, राजाभाऊ टोपे, नामदेव पौळ, सतीश टोणगे, शिवाजी कदम, विशाल वाघमारे, सुरेश इंगळे ,जयसिंग चौधरी, विठ्ठल समुद्रे, राजाभाऊ गरड, तात्या माने,बाबुराव गिरी, कैलास खोपकर, भगवान खैरमोडे, अनिल पवार ,सचिन शिंनगारे, सुनील पवार, शंकर खंडागळे, वैभव सुरेश शेळके आदींचा समावेश आहे.