शिंदे गटाचे लोकसभा संपर्कप्रमुख अनंतराव जाधव म्हणाले,धाराशिवची जागा शिवसेनेचीच
प्रतिनिधी / धाराशिव
गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस NCP आणि शिवसेनेत Shivsena जोरदार लढत झालेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात यावेळीही शिवसेनेविरोधात (ठाकरे गट) राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार गटाने (Ajit Pawar)आपला दावा केला आहे. दुसरीकडे भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) (Eknath Shinde)पक्षाकडून लोकसभेसाठी तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकत्रित नांदत असलेल्या तीन पक्षांच्या महायुतीत यानिमित्ताने तणाव वाढण्याचे संकेत आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे लोकसभा संपर्कप्रमुख अनंतराव जाधव (Anantrao jadhaw) यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना धाराशिवच्या जागेवर आम्हीच लढणार, असे ठणकावून सांगितले.या जागेसाठी महायुतीत तणाव वाढल्यास बंडाळी होऊ शकते, त्याचा फायदा ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर omprakash raje nimbalkar यांना होऊ शकतो.
महायुतीमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अशा तीन पक्षांचा समावेश आहे. 2019 च्या निवडणुकीत धाराशिव लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरूध्द शिवसेना असा थेट सामना झाला होता. आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन नेते राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर चार वर्षात जिल्ह्यात भाजपनेही पाळेमुळे घट्ट केली आहेत. त्यामुळेच भाजपने थेट लोकसभा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात जिल्हा दौऱ्यावर आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला. पक्षाने वेगवेगळ्या संस्थेमार्फत सर्व्हे करून भाजपला लोकसभा निवडणुकीत यश मिळेल का, याची चाचपणी केली आहे. या सर्व्हेमध्ये दिसणारे चित्र भाजपसाठी अनुकूल असल्याने पक्षाने लोकसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली आहे.मात्र दुसरीकडे राज्याच्या राजकारणात भाजपसोबत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र असल्याने भाजपने अजूनतरी लोकसभेबाबत थेट भूमिका जाहीर केली नाही. मात्र स्वबळावर लढण्यासाठी तयार रहा असे आदेशच पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दुसरीकडे मागच्या निवडणुकीत वातावरण अनुकूल नसतानाही राष्ट्रवादीच्या उमेदवाराने मोठी मते घेतल्याने आता अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या गटानेही धाराशिव लोकसभेची जागा लढविण्यासाठी तयारी केली असून,एका गटाने अजितदादांची भेट घेऊन या जागेसाठी आग्रह धरला आहे. शिंदे गटाने उमेदवार कोण असावा,याची. चाचपणी सुरू केली आहे. 15 दिवसापूर्वी माजी खासदार प्रा.रवींद्र गायकवाड यांनी शिंदे गट ही जागा लढवणार असल्याचे सांगितले होते. बुधवारी या गटाचे लोकसभा संपर्कप्रमुख अनंतराव जाधव यांनी धाराशिव लोकसभेची जागा शिवसेनेचीच असणार, असा दावा पत्रकार परिषदेत केला. यावेळी शिवसेना उपनेते तथा धाराशिव लोकसभा संपर्कप्रमुख अनंतराव जाधव,धनंजय सावंत, सह संपर्कप्रमुख अनिल खोचरे,जिल्हाप्रमुख सुरज साळुंके,दत्ताण्णा साळुंखे,गौतम लटके,मोहन पनुरे,ईश्वर शिंदे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड, सह संपर्कप्रमुख अमरराजे कदम,अजित लाकाळ उपस्थित होते.
काय म्हणाले, अनंतराव जाधव?
25 वर्षापासून लोकसभेची जागा ही शिवसेनेकडेच असून, येणाऱ्या लोकसभेतही ही जागा शिवसेना लढवणार आहे .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो उमेदवार देतील त्यांना आम्ही निवडून आणण्याचा निर्धार केला आहे, असे लोकसभा संपर्कप्रमुख अनंतराव जाधव यांनी सांगितले. त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये शिवदूत बूथ प्रमुख सदस्य नोंदणी याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांना पंधरा दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून, धाराशिव जिल्ह्याची परिस्थिती ही इतर जिल्ह्यापेक्षा टॉपवर असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी महायुती 45 जागांवर निवडून येईल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. घटक पक्षाने जरी उमेदवार जाहीर केला असेल तरीही धाराशिवची जागा शिवसेनाच लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.