अमोलसिंह चंदेल / शिराढोण
शिराढोण (ता.कळंब) येथील सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान म्हणून ओळख असलेल्या हजरत खॉजा नसिरोद्दीन बाबा यांचा उरूस गुरुवारपासून सुरू झाला आहे. या उरुसानिमीत्त गावात मुख्य रस्त्यावर विद्यूत रोषणाई करण्यात आली असून,त्यामुळे बाबांचा दरबार लखलखीत झाला आहे. तसेच विविध धार्मिक, समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.उरुसाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण आहे.
शिराढोण येथे 700 वर्षा पूर्वीचा एैतिहासिक दर्गाह आहे.हा दर्गाह सर्व धर्मीयांचे श्रध्दास्थान आहे. या ठिकाणी परिसरातील सर्वच जाती धर्माचे लोक श्रध्देने जावून आपली मनोकामना व्यक्त करतात. बाबांच्या उरूसात शिराढोण आणि परिसरातील प्रत्येक घरातील प्रत्येक जण प्रचंड उत्साहाने सहभागी होत असतो. याची प्रचिती बाबांच्या उरूसात सहभागी झालेल्या प्रत्येकाला आल्याशिवाय राहत नाही. या मिरवणूकीत बाबांच्या मानाच्या घोडयाची पूजा करून पोलीस स्टेशनमध्ये आणले जाते. तेथे ठाणेदारांच्या हस्ते मानाची चादर चढविण्याची प्रथा आहे. गुरुवारी बॅड पथकांच्या निनादात भव्य संदल मिरवणूक
पार पडली. या दर्गाहची देखभाल व दैनंदिन धार्मीक विधी करण्याचे कार्य गावातील खातीब समाजाकडे आहे. या उरूसानिमीत्त शिराढोणमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये 6 व 7 तारखेला सायंकाळी कव्वालीचा मुकाबला रंगणार आहे. यामध्ये प्रसिध्द कव्वाल मुइन नाजा (मुंबई), नसरत नाज (मुंबई), अमन साबरी (मुंबई) तसेच लहसीना नाज (कर्नाटक मैसूर) यांना आमंत्रित करण्यात आले आहे.या उरूसाच्या कालावधीत चिरागा, चादर, जुलूस, जिरायत आदी धार्मीक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा लाभ परिसरातील सर्व जनतेने घेण्याचे आवाहन उरुस कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.