अमोलसिंह चंदेल / शिराढोण
शिराढोण (ता.कळंब) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचा-यांच्या उदासिनतेमुळे रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नसल्याने शिराढोणसह परिसरातील गावांमध्ये संताप व्यक्त होत आहे. असून अडचण झालेले हे आरोग्य केंद्र जणू रुग्णांच्या मुळावर उठले आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.काही कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने नियमित कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे,असे असतानाही काही कर्मचारी मात्र कामावर नियमितपणे येत नसल्याने आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे.
रुग्णांना सेवा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर शिराढोण व परिसरातील 20 ते 25 गावांतील रुग्ण अवलंबून आहेत. विविध मागण्यांसाठी 25 आॅक्टोंबरपासून कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत. कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने नियमित असणा-या कर्मचा-यांची जवाबदारी व काम वाढले आहे . माञ नियमित कर्मचा-यांच्या उदासिनतेमुळे सध्या रुग्णांचे हाल होत असून त्यांना सेवा मिळणे कठीण झाले आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज शेकडो बाह्य रुग्ण तपासणीसाठी व उपचारासाठी येतात मात्र कर्मचा-यांची गैरहजेरी व उदासिनतेमुळे त्यांना सेवा मिळत नसल्याच्या रूग्णांच्या तक्रारी दिसून येतात. या प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमीत वैद्यकिय अधिकारी, तात्पुरत्या स्वरुपातील वैद्यकिय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, औषध निर्माता, परीचर 3, आरोग्य सेविका, अशी एकूण नियमीत स्वरुपातील 9 पदे कर्यरत आहेत तर कंत्राटी पदे 4 आहेत. कंत्राटी कर्मचा-यांचा संपामुळे हे कर्मचारी कामावर हजर नाहीत परंतू नियमित पदे असणा-या 9 कर्मचा-यांपैकी
काही कर्मचारी आपली सेवा योग्य पद्धतीने बजावतात. उर्वरित कर्मचा-यांच्या उदासनितेमुळे या केंद्रात रूग्णांना सेवा मिळणे कठीण झाले आहे. आरोग्य केंद्राच्या या उदासीनतेची तक्रार ग्रामपंचायतीमार्फतही काही दिवसापुर्वी जिल्हा आरोग्य विभागाला करण्यात आली आहे. त्यानंतरही कोणताही परिणाम कामकाजावर दिसून आलेला नाही.
३-३ प्रतीक्षा, उपचार होईनात
माझ्या मुलीला वैद्यकिय उपचारासाठी 15 तारखेला सकाळी 9 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात आलो होतो. परंतू येथे वैद्यकिय अधिकारी यांच्यासह केवळ 2 कर्मचारी हजर
असल्याने व महिला कर्मचारी उपलब्ध नसल्याने मला येथे सेवा मिळाली नाही. या आरोग्य केंद्रात 3 तास थांबलो होतो. परंतू मला कर्मचारी गैरहजर असल्याचे सांगण्यात आले.
अशोक निपाणीकर, निपाणी.
गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई
गैरहजर राहणा-या तसेच कामात कूचराई करण्याा-या संबंधीत कर्मचा-यांची चैकशी करुन दोषी असणा-या कर्मचा-यांवर कारवाई करण्यात येईल.
डाॅ.ए.ए.घोगरे, तालुका वैद्यकिय अधिकारी.