बळीराजा चिंतेत, कळंब तालुक्याला मोठ्या पावसाची आशा
अमोलसिंह चंदेल / शिराढोण
यावर्षी पावसाने दडी मारल्याने कळंब तालुक्यातील शिराढोण व परिसरातील जमीनीची तहान पुर्णपणे भागली नाही. अत्यल्प पावसामुळे खरिपाची पिकेही वाया गेल्यात जमा आहेत तर शेतकऱ्यांच्या विहीरी,कुपनलीका व सार्वजनिक पाणी पुरवठ्याचे स्रोत आटत आहेत. त्यामुळे खरीपापाठोपाठ आता पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. पावसाच्या अवकृपेने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
पावसाअभावी पाणीसाठा कमालीचा घटला असून, त्यामुळे परीसरातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम जोपासण्यासाठी कमतरतेमुळे कसरत करावी लागणार आहे. घटणाऱ्या पाणी पातळीमुळे येणाऱ्या काळात शिराढोण व परीसरास भिषण पाणी टंचाईस सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. दरवर्षी पडणाऱ्या पावसाचे पाणी जमीनीत मुरल्यामुळे मानवनिर्मीत पाणीसाठ्यात साठलेल्या पाण्यावरच शेतीची व पीण्याच्या पाण्याची गरज भागवली जाते. या पाण्यावरच परीसरातील शेतकरी पीकांची जोपासणा करून उत्पादन घेतात. शिराढोण व परिसरात गेल्या चार वर्षापासून कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीलाच थोडाफार पाऊस पडला व गेल्या 2 महिन्यापासून पावसाने खंड दिला व पावसाचे पाणी जमीनीत मुरण्याची प्रक्रीयाही मंदावली. परिणामी परीसरातील पाण्याची जमीनीतील पातळी कमालीची खालावली. यंदा निसर्गाची शिराढोण व परिसरावर वक्रदृष्टी कायम असल्याने परिसरातील जमीनीतील पाण्याच्या पातळीत परिणामकारक अशी वाढ झाली नाही.
फेब्रुवारीमध्येच घटला पाणीसाठा
गेल्यावर्षी अतिवृष्टी होऊनही यावर्षी साधारणत: फेब्रूवारी महिन्याच्या मध्यानंतर शेतकऱ्यांच्या विहीरीतील पाणीसाठा घाटायला सुरुवात झाली होती. पावसाचे प्रमाण कमालीचे घटल्याने फेब्रुवारीपासून पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या होत्या. आता ऑगस्टमध्ये मात्र त्यात भर पडली आहे.
पाणीवापराबाबत नियोजनाची गरज
परिसरातील एकंदरीत परिस्थिती पाहता भविष्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, याचे गंभीर परिणाम लक्षात घेता प्रशासकीय पातळीवरून शेतीच्या तसेच पिण्याच्या पाणी वापराबाबत योग्य नियोजन करण्याची गरज आहे. त्याचबरोबर प्रशासकीय व सामाजिक पातळीवरून परिसरातील जनतेतबाबत जागृती करून पाण्याचा काटकसरीने वापराबाबत सर्वांना जाणीव करून देणे गरजेचे आहे.
ग्रामपंचायतीचे नियोजन सुरू
यावर्षी आतापर्यंत पावसाळ्यात एकाही मोठ्या पावसाची नोंद झाली नाही. त्यामुळे सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या जलस्त्रोतांचीही पाणी पातळी खालावली आहे. भविष्यात टंचाई उपाययोजना म्हणून आम्ही अधिग्रहणाचे प्रस्तावही पाठविले आहेत तसेच मांजरा धरणावरूनही कायमस्वरूपी जलवाहिनीसाठी ग्रामपंचायत पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत.
– लक्ष्मी म्हेत्रे, सरपंच, शिराढोण