जहीर इनामदार / नळदुर्ग
सुंदर माझी शाळा या उपक्रमासाठी सरपंच महिलेने चारधाम यात्रेसाठी जमा केलेली रक्कम देण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला असून, या निर्णयाबद्दल सरपंच महिलेचे कौतुक होत आहे. आधी आपण स्वतः शाळेसाठी मदत करून इतरांना शाळेचं महत्व पटवून देणाऱ्या या सरपंच महिला आदर्श ठरल्या आहेत.
तुळजापूर तालुक्यातील वागदरीच्या सरपंच तेजाबाई शिवाजीराव मिटकर यांनी चारधाम यात्रेसाठी कुटुंबानी दिलेली पंचवीस हजार रुपयांची रक्कम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विकासासाठी दिली.
गावाच्या विकासात मोलाचं योगदान
मिटकर कुटुंबीयांनी वागदरी गावासाठी दिलेले योगदान पाहून ग्रामस्थांनी वर्षभरापूर्वी तेजाबाई मिटकर यांना सरपंचपदी बसवले.मागील वर्षभरात श्रीमती मिटकर यांनी गावांमध्ये बंदिस्त नाली,शाळा सुशोभीकरण, ग्रामपंचायत कार्यालय नूतनीकरण,स्ट्रीट लाईट,सिमेंट बंधारा ईत्यादी कामांची सुरुवात करून लोकार्पण ही केले. गावामध्ये चोवीस तास स्वच्छ व शुद्ध पाणी देण्याच्या ‘हर घर नळ’ योजनेच्या सत्तेचाळीस लाखांच्या पाईपलाईन योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.तसेच मराठा स्मशानभूमी पेव्हर ब्लॉक बसवणे,मुस्लिम स्मशानभूमी सिमेंट रस्ता आदी कामांचे भूमिपूजन झाले आहे.तर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ता मंजूर झाला आहे.
पंचक्रोशीत कौतुक
30 नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार राज्यभरात “मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा” (eknath shinde) हे अभियान सुरू केले आहे. या अभियानात क्रमांक आणायचा निर्णय वागदरी ग्रामस्थांनी केला आहे.अल्पावधीतच याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यासाठी सरपंच तेजाबाई मिटकर यांनी 25 हजार रुपये देऊन या अभियानाची सुरुवात केली आहे. हे अभियान यशस्वी करण्याच्या निर्णयाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.