–सज्जन यादव,धाराशिव
मनोहर भिडे नामक एका व्यक्तीने परवा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. महात्मा गांधी यांचे वडील करमचंद गांधी नसून एक मुस्लिम जमीनदार त्यांचे वडील होते असे ते विधान. वास्तविक हे विधान ऐकून कुठल्याही व्यक्तीला संतापच येईल. परंतु हे विधान करून दोन दिवस झाले तरीही आपल्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्याना अजून संताप का येत नाही, हा प्रश्न आहे. दोन दिवस झाले तरीदेखील मनोहर भिडेंवर कुठलीच कार्यवाही झालेली नाही.पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात याबद्दल आवाज उठवल्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘माहिती घेतो’ असे मिळमिळीत उत्तर दिले.ही तर महाराष्ट्रासारख्या वैचारिक वारसा सांगणाऱ्या राज्यासाठी खेदाची बाब आहे.
मनोहर भिडेच्या या एका वाक्यामुळे महात्मा गांधींची फार हानी होणार नाही. जो व्यक्ती बंदुकीच्या दोन गोळ्यांनी मरू शकला नाही, तो अशा पामरांच्या एका वाक्याने काय मरणार? परंतु दोन गोळ्यांनी मारलेली व्यक्ती गेली पंचाहत्तर वर्षे झाली न मरता उलट कणाकणाने अजून जिवंत कशी काय होत आहे? हा देशातल्या एका वर्गाला छळणारा प्रश्न आहे. हाच प्रश्न त्या वर्गाला अस्वस्थ करतो आणि भिडेसारख्या व्यक्तींच्या मार्फत या महात्म्याला ठरवून बदनाम करण्याचे हररोज प्रयत्न करतो. गेल्या पंचाहत्तर वर्षात या महात्म्याला खूपदा मारायचे प्रयत्न झाले. पण प्रत्येकवेळी हा महात्मा चष्म्याआडून निरागस डोळ्याने मारेकऱ्यांकडे पाहून हसतोय. महात्म्याचे हेच हास्य त्या वर्गाला पुन्हा पुन्हा अस्वस्थ करते आणि पुन्हा नव्याने त्याला मारण्याचे प्रयत्न होतात. हा खेळ आजचा नाही गेली पंचाहत्तर वर्षे झाली अविरतपणे सुरू आहे. एकाच महात्म्याला मारण्यासाठी एका वर्गाच्या चार पिढ्या गेल्या, परंतु तरीही महात्मा मरतच नाही.
मनोहर भिडेनी केलेले हेच विधान जर सावरकरांबद्दल केले असते तर राज्य आणि केंद्र सरकारने अशीच गप्प राहायची भूमिका घेतली असती का? गांधी नावाचा महात्मा आज कुठल्याच एका समाजाचा नाही म्हणून पोरका आहे का? सावरकरांबद्दल कुणी काही एखादे विधान केले तर ती महापुरुषांची बदनामी ठरते, मग गांधी महापुरुष नाहीत का? हे एकदा सरकारने स्पष्ट करावे. गेल्या आठ-नऊ वर्षात गांधी, डॉ.आंबेडकर, फुले, सावित्रीमाई, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचा ठरवून अपमान केला जातोय. आणि असा अपमान कारणाऱ्यालाच देशभक्तीचे प्रमाणपत्र दिले जातेय हे दुर्दैवी आहे. गेल्या काही वर्षात गोडसेचे उदात्तीकरण आणि गांधींचे विद्रुपीकरण करण्याचा एक कलमी कार्यक्रम एका वर्गाकडून राबवला जातोय आणि त्याला सरकारकडून पूरक भूमिका घेतली जातेय. मागे एकदा याच मनोहर भिडेनी भारताला ‘गांधीबाधा’ झालीय असे हिणकसपणे म्हंटले होते. परंतु या भिडेना कल्पना नाही की हीच गांधीबाधा आपली वैश्विक ओळख आहे. आजही परदेशी पाहुणा साबरमतीला जाऊन याच महात्म्यापुढे नतमस्तक होतो. आजही जगात भारताला बुद्धांचा आणि गांधींचा देश म्हणूनच ओळखले जाते. परंतु हे गांधी समजायला बौद्धिक कुवत लागते आणि तीच कुवत या वर्गाकडे अजून आलेली नाही.
गांधीजींवर जगात एक लाखाहून जास्त पुस्तके लिहिली गेलीत. जगात सहाशेहून अधिक विद्यापीठात गांधी आणि गांधीविचार शिकवला जातो. मार्टिन ल्यूथर किंग पासून नेल्सन मंडेला पर्यंत आणि बराक ओबामा पासून आंग सांग स्यू की यांच्यापर्यंत साऱ्यांनाच गांधी हे त्यांचे प्रेरणास्थान आणि स्फूर्तीस्थळ वाटते. हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकणाऱ्या अमेरिकी वैमानिकांनाही पश्चात्तापानंतर गांधींचा विचारच शेवटचा आधार वाटतो. जगाला हवाहवासा वाटणारा हा महात्मा आपल्याच देशात परका करण्याचे प्रयत्न मुद्दामहून केले जात आहेत. पुढच्या पिढीसमोर विकृत गांधी सादर करणे हाच एककलमी कार्यक्रम राबवला जात आहे. मनोहर भिडे सारख्या प्रवृत्ती याच कामासाठी जुंपलेल्या असतात. अशा व्यक्तींनी अशा प्रकारचे कितीही गुन्हे केले तरी यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता कमीच असते. गांधी नावाचा व्यक्ती मारला पण त्याचा विचार हे लोक मारू शकले नाहीत, रोज नवा विचार घेऊन गांधी नव्याने जन्म घेतो. मोदी सरकारने स्वच्छ भारतच्या लोगो मध्ये गांधींचा चष्मा घेतला, पण ते चष्म्या पलीकडचा गांधींचा दृष्टीकोन घेऊ शकते नाहीत. सरकारी भिंतीवर स्मित हास्य करत एकटक बघणारा गांधी खरा नाही, खरा गांधी सर्वसामान्यांच्या मनात आणि हृदयात विचार म्हणून जिवंत आहे. त्या गांधीला कुणीच मारू शकत नाही किंवा त्याची प्रतिमाही कुणी मलिन करू शकत नाही. कारण तो मरून उरलेला महात्मा आहे…!
मोबाईल-9689657871