प्रतिनिधी / कळंब
स्वतंत्र मराठवाडा राज्य करण्याची मागणी करणाऱ्या व त्यानुषंगाने जनजागृती करण्यासाठी कळंब शहरात आलेल्या रथयात्रेला कडाडून विरोध करत संभाजी ब्रिगेडने चोख उत्तर दिले. त्यानंतर ही रथयात्रा शहराबाहेर लावण्यात आली. कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा प्रकार घडला. स्वतंत्र मराठवाडा राज्य कशाला हवे,संयुक्त महाराष्ट्र हेच कायम राहील, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली. त्यामुळे राथयात्रेला आल्या पावली परतावे लागले.
स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मितीची मागणी करणारी रथयात्रा रविवारी कळंब शहरात आली होती. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा शाखेच्या वतीने या रथयात्रेचा जाहीर निषेध केला. स्वतंत्र मराठवाडा रथयात्रेचा हा कार्यक्रम संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून, निषेधाची घोषणाबाजी करीत उधळून लावला आणि हा रथ कळंब शहरातून बाहेर घालवून दिला. संयुक्त महाराष्ट्राच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी करीत संभाजी ब्रिगेडने स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मितीच्या मागणीला जाहिर निषेध करीत कडाडून विरोध केला. संभाजी ब्रिगेड संपूर्ण मराठवाड्यामध्ये या रथयात्रेला विरोध करील अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड यांनी मांडली.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या शहीदांची अवहेलना करुन पुरोगामी महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्या गँगचा हेतू साध्य होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ॲड.तानाजी चौधरी यांनी दिला.
याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड, जिल्हाध्यक्ष ॲड.तानाजी चौधरी, कळंब तालुकाध्यक्ष दत्तात्रय कवडे,विभागीय उपाध्यक्ष ज्ञानेश्र्वर कुरडे पाटील, विभागीय सचिव विलास गुंठाळ,अशोक चोंदे, पंकज भिसे,इम्रान मिर्झा, शरद जाधव,दत्तात्रय पवार, शुभम पवार , अमोल पवार, शिवलिंग लोखंडे,वैभव जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.