विक्रांत उंदरे / वाशी
शिवप्रतिषठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी भगवा ध्वज राष्ट्रध्वज करण्याची वादग्रस्त मागणी केली असून, त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने वाशी शहरातील छत्रपती संभाजीराजे चौकात भगवा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न झाला, परिणामी
तणाव निर्माण झाला होता. मात्र, प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तसेच वाशीकरांनी अत्यंत सामंजस्य दाखवत भगवा ध्वज लावण्याऐवजी तिरंगा ध्वज फडकवला आणि तणाव निवळला. हा प्रकार मंगळवारी स्वातंत्र्यदिनी सकाळी ९ वाजता घडला. स्वातंत्र्यदिनी तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन केल्यानंतर निर्माण झालेली तणावाची परिस्थिती नियंत्रणात आली.
संभाजी भिडे यांनी यापूर्वीही अनेकवेळा राष्ट्रध्वज तिरंग्याऐवजी भगवा ध्वज असावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आजही त्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेत भगवा ध्वज राष्ट्रध्वज करावा अशी मागणी केली आहे. या मागणीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानुसार राज्यात वेगवेगळ्या भागात स्वातंत्र्यदिनी भगवा ध्वज लावण्यात येणार होते. वाशी शहरात हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रेचे आयोजन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने केले होते. मात्र प्रशासनाची परवानगी न घेतल्याने पोलिस प्रशासनाने रॅलीस परवानगी दिली नाही. यावेळी चौकातील ध्वजस्तंभावर जुना भगवा ध्वज काढून नवीन ध्वज फडकवत असताना पोलिसांनी तरुणांच्या जमावाला अडवले. यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस व्हॅनच्या माध्यमातून जमावबंदी आदेश लागू असल्याचे पोलिसांकडून पुकारण्यात आल्याने जमलेला तरुणांचा जमाव पांगला. यादरम्यान सामाजिक समरसतेचा विचार करत नगरसेवक राजु कवडे , पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशी दसुरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक ससाणे, उपनिरीक्षक रमेश घुले, किशोर काळे, पोलिस कॉन्स्टेबल नवनाथ सुरवसे यांच्या मध्यस्थीने चर्चा करून राष्ट्रध्वज फडकविण्याचा सलोख्याच्या मार्ग काढण्यात आला. त्यामुळे शहरात निर्माण झालेली तणावाची परिस्थिती निवळली आहे.
वाशीचा आंबा आणि भिडे
यापूर्वी देखील मूल होण्यासाठी वाशी येथील आंब्याचा संदर्भ देत भिडे यांनी वादाला तोंड फोडले होते. या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.गेल्या 15 दिवसांपूर्वी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यासह महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता भगवा ध्वज राष्ट्रध्वज करावा अशी मागणी केली आहे. त्यांच्या आवाहनानुसार वाशीमध्ये मुख्य चौकात भगवा फडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र,तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीसांनी मध्यस्थी करत हा प्रकार टाळून तिरंगा फडकविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी वाशीकरांनी मोठ्या मनाने सामंजस्य दाखवले.