प्रतिनिधी / धाराशिव
शहरातील समस्येवर आता धाराशिवकर भूमिका घेऊ लागलेत. चिखलमय रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी आठ दिवसांत विविध आंदोलने झाली,त्यानंतर पालिकेची यंत्रणा हलली. रस्त्यांची दुरुस्ती सुरू झाली आहे. मात्र,शहरातील सहनशील नागरिकांचा संयम संपत असल्याचे दिसून येत आहे.कारण शहरातील समता नगरातील रखडलेल्या सिमेंट रस्त्याच्या मागणीसाठी 10 तारखेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा समता गृहनिर्माण संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे इतरत्र तत्पर झालेली पालिका या कामाबद्दल कोणती भूमिका घेते,याकडे लक्ष लागले आहे.
यासंदर्भात गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष संतोष उर्फ नाना घाडगे,सचिव पंकज पडवळ यांनी पालिकेला तसेच जिल्हाधिकारी यांना मंगळवारी निवेदन दिले असून,त्यात म्हटले आहे की, समता नगर येथील माळी घर ते नागणे घर या रस्त्याचे भुयारी गटारीचे मेन होल चेंबर्स, हाऊस कनेक्शन चेंबर्सचे सर्व कामकाज पुर्ण झाले आहे. शिवाय माळी घर ते नागणे घर या रस्त्याची काँक्रेट रस्ता बनविण्याची निविदा नगर परिषद कार्यालयामार्फत मंजूर होऊन वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे. भुयारी गटारीचे कामकाज होऊन जवळपास २ ते ३ महिने झाले आहेत. मात्र अद्याप रस्त्याच्या कामकाजास सुरुवात झाली नाही. परिणामी रहिवाशांचे अत्यंत हाल होत आहेत.तसेच रहिवाशांना जाणीवपूर्वक वेठीस धरले जात आहे. याबाबत न.प. च्या सर्व संबंधित अधिका-याना प्रत्यक्ष भेटून वारंवार कळवूनही अद्याप काम सुरू होत नाही.यानुषंगाने ठेकेदारास वर्क ऑर्डर दिल्याचे समजते.मात्र कामकाज सुरु का केले नाही, ठेकेदार व प्रशासन हे कोणाच्या दबावाखाली आहे काय ? या बाबतचा खुलासा करुन सदरचे कामकाज त्वरीत सुरु करावे. अन्यथा १० ऑगस्टपासून सदरील रस्त्यावर बेमुदत उपोषण केले जाईल.