राज्य सरकारने शासन निर्णय निर्गमित करून जाहीर केली निवड
आरंभ मराठी / धाराशिव
महाराष्ट्र इंस्टीट्यूट फॉर ट्रान्सफॉरमेशन – मित्र या संस्थेच्या नियामक मंडळातील उपाध्यक्ष पदावर तुळजापूरचे भाजप आमदार आणि भाजपाचे नेते राणाजगजितसिंह पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.
नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र इंस्टीट्यूट फॉर ट्रान्सफॉरमेशन -मित्र या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. राज्यांच्या गरजांची दखल घेत खाजगी क्षेत्र आणि अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद व सर्वसमावेशक विकास करण्यासाठी महाराष्ट्र इंस्टीट्यूट फॉर ट्रान्सफॉरमेशन – मित्र या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
मित्र संघटनेच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. तर उपाध्यक्षपदी राणाजगजितसिंह पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे- पाटील आणि शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचीही उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. मित्र संस्थेच्या माध्यमातून राज्याच्या निर्णय प्रक्रियेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा आता थेट सहभाग असणार आहे. राणा पाटील यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.