आरंभ मराठी / धाराशिव
लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवसांपासूनच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या पराभवाचे दुःख न करता जिल्ह्याच्या विकास कामांसाठी कंबर कसली आहे. मंगळवारी लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर लागलीच आमदार राणा पाटील यांनी निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या 123 कोटींच्या विशेष दुरुस्तीच्या प्रस्तावासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरु केले आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील अनेक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले आहेत. उस्मानाबाद लोकसभेतही महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, त्यांचे पती आणि तुळजापुरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या पराभवाचे दुःख न करता थांबलेल्या विकास कामांसाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरु केले आहेत.
काय आहे योजना?
मागील १२ वर्षापासून बंद असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून उच्चाधिकार समितीच्या मान्यतेने या योजनेच्या विशेष दुरुस्तीचा ११३.५३३ कोटी अंदाजपत्रकीय किमतीचा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून नुकताच प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात आला असून, या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करत असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
प्रशासकीय मान्यतेसाठी पाठपुरावा
आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून ही महत्त्वाची योजना कार्यान्वित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. या अनुषंगाने विविध विभागांची आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी आता शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
हजारो शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना
धाराशिव, लोहारा व औसा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत महत्वपूर्ण आहे. मागील अनेक वर्षांपासून देखभाल दुरुस्ती अभावी बंद असलेली ही योजना कार्यान्वित करण्यासाठी स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी या तिन्ही विभागांसंबंधित दुरुस्ती आवश्यक होती. या योजनेचे आशिव, कानेगाव, करजखेडा, वडाळा, बामणी असे ५ टप्पे असून यामुळे ६८९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यातील ५७०० क्षेत्र केवळ धाराशिव तालुक्यातील आहे.
योजना कार्यान्वित करण्यासाठी योजेनची संपूर्ण पाहणी करून स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी संबंधित दुरुस्तीचे अंदाज पत्रक तयार करून विशेष दुरस्तीचा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या मंजुरीने राज्य तांत्रिक सल्लागार समितीच्या मंजूरी साठी पाठविण्यात आला होता. सदरील समितीने ११/०१/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावास मंजूरी दिली होती.