आरंभ मराठी / धाराशिव
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हॉटेल पुष्पक पार्क येथे जमलेल्या मराठा आंदोलकांवर धाराशिव येथील आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे पोलिसांच्याच माध्यमातून संवाद साधला गेला तर दुसरीकडे तरुणांवर पोलिस कारवाई करण्यात आली आहे.
सोमवारी ( दि.५) मनसे प्रमुख राज ठाकरे धाराशिव शहरात आले असता, ठाकरे यांनी सोलापूर येथे आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी मराठा आंदोलक हॉटेलवर गेले होते. यावेळी राज ठाकरे यांना आंदोलकांनी भेटण्याची वेळ मागितली असता ठाकरे यांनी सुरुवातीला भेट नाकारली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी हॉटेलमध्येच घोषणा देण्यास सुरुवात केली होती.
त्यानंतर आंदोलकांनी हॉटेलच्या बाहेर ठिय्या मांडून घोषणा दिल्या होत्या. तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे स्वतः आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी दाखल झाले होते. अतुल कुलकर्णी यांनी आंदोलक आणि राज ठाकरे यांच्यात संवाद घडवून आणत वातावरण शांत केले होते.
त्यानंतर मंगळवारी सकाळी पोलिसांच्या संरक्षणात राज ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली होती. मंगळवारी राज ठाकरे लातूरकडे रवाना झाल्यानंतर मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये धैर्यशील गोपाळराव सस्ते (रा. येडशी), निखील जगताप (रा. माउली चौक धाराशिव), निलेश सांळुके, बलराज रणदिवे, अभिजीत सुर्यवंशी, अक्षय अंकुश नाईकवाडी (रा. कौडगाव), अमित वसंतराव जाधव (रा. नारी ता. बार्शी), हणमंत यादव, बापू देशमुख (रा. गणेश नगर धाराशिव) सौरभ गायकवाड (रा. तांबरी विभाग), तेजस बोबडे (रा. तुळजापूर) अशा अकरा जणांवर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या सर्वांनी सोमवारी सायंकाळी सहा ते सात दरम्यान कोणतीही पुर्वसुचना न देता, गैरकायद्याची मंडळी जमवून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये आरक्षण देण्याची गरज नाही हे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र शासनाविरुध्द घोषणा देवून, राज ठाकरे यांना हॉटेल पुष्पक पार्क धाराशिव येथुन बाहेर पडण्यास मज्जाव केला. तसेच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. यावरुन फिर्यादी हनुमंत जालीदंर म्हैत्रे (नेमणुक – आनंदनगर पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 189 (2),323, 126(2) सह 135 मपोका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.