सुभाष कुलकर्णी / तेर
धाराशिव तालुक्यात पोलीओचा संशयित रूग्ण आढळला असून, यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.आरोग्य विभागाच्या वतीने परिसरातील 5 किलोमीटर अंतरातील 3 गावात पल्स पोलीओ विशेष अभियान राबविण्यात येत आहे. 5 वर्षाच्या आतील बाळांना पल्स पोलीओ डोस पाजण्यात येत आहे.
एकीकडे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जात असताना आणि आपला देश पोलिओ मुक्त झाल्याची वल्गना होत असताना जगजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या भिकारसारोळा या गावात 5 वर्षाचा मुलगा पोलिओ संशयित आढळून आला आहे.त्यामुळे संशयित रूग्ण आढळलेल्या गावापासून 5 किलोमीटर परिसरातील गावात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. भिकारसारोळा,पळसप,व म्होतरवाडी याठिकाणी जागजी आरोग्य केंद्राच्या वतीने घरोघरी जावून 5 वर्षाच्या आतील बालकांना पल्स पोलीओ डोस पाजण्यात येत आहे.
असे आले प्रकरण समोर ?
भिकारसारोळा येथील या मुलास आजारावरील उपचारासाठी मुरुड (जि.लातूर) येथे नेण्यात आले होते.परंतु तपासणीत पोलीओची लक्षणे आढळून आली.त्यामुळे खबरदारी म्हणून परिसरातील 3 गावात विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.दरम्यान या बाळाचे शौचाचे नमुने मुंबई येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले.आहेत.जागजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शाम पाटील, समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक ढेकणे, आरोग्य पर्यवेक्षक प्रकाश शिरसाट, जंगाले, साथरोग तज्ञ मानाजी नागलबोने LT. श्रीमती होंडकर LHV, श्रीमती येतवाडे, परिचारिका शर्मिला ठवरे, आशा पर्येवेक्षिका संगिता डोलारे,शितल जाधव हे तेरसह अन्य परिसरातील गावात घरोघरी जाऊन पोलीओ लसीकरण करीत आहेत. दरम्यान, यापूर्वी म्हणजे जानेवारी 2021 मध्ये बुकनवाडी येथेही एक पोलीओ संशयित बाळ सापडले होते.