maharashtra political crisis: अजित पवारांच्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडी वेगानं सुरू आहेत. मुंबईत अजित पवारांचा गट शक्तिप्रदर्शन करत असताना पुण्यात मात्र त्यांना धक्का बसला आहे.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. बहुतांश आमदार आपल्या सोबत असल्याचा अजित पवारांचा दावा आहे. अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सत्तेत गेल्यानं त्यांच्याकडे जाणाऱ्या आमदारांची संख्या अधिक आहे. पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुण्यातील १० पैकी बहुतांश आमदार अजित पवारांकडे गेले आहेत. तर काही वेट अँड वॉचच्या स्थितीत आहेत.
अजित पवार पुण्यातील बारामतीमधून निवडून येतात. त्यांच्यासोबत शपथविधीला दिसलेले आमदार अतुल बेनके यांनी आता व्हॉट्स ऍप डीपीवर शरद पवारांसोबतचा फोटो ठेवला आहे. त्यामुळे ते शरद पवारांना पाठिंबा देतील अशी चर्चा आहे. तर दिलीप वळसे पाटील, अशोक पवार, सुनिल शेळके, दत्ता भरणे, संजय बनसोडे, दिलीप मोहिते यांनी अजित पवारांना साथ दिली आहे. पुण्यातील राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांना निवडून आणण्यात काँग्रेसची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळेच बहुतांश आमदारांनी बंडानंतर अजित पवारांना साथ दिली आहे.
आमदारांच्या रस्सीखेचीनंतर पक्ष कार्यालयांसाठी दोन्ही गटांमध्ये रस्सीखेच दिसत आहे. पुण्यातील बहुतांश आमदार अजित पवारांच्या पाठिशी उभे राहिले असताना पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. जगताप यांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालयाचं ऍग्रिमेंट प्रशांत जगपात यांच्या नावानं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराच्या नावानं पॅन कार्ड नसल्यानं अजित पवार गटाची गोची झाली आहे.
‘कार्यालयाचं ऍग्रिमेंट माझ्या नावानं आहे. शहराध्यक्ष म्हणून मी ते माझ्या नावे केलं आहे. त्यामुळे उद्या या कार्यालयाचा ताबा अन्य कोणाकडून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याविरोधात मला पोलीस तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे पुणे शहर राष्ट्रवादी कार्यालयाचा ताबा कोणीच घेऊ शकत नाही,’ असं जगताप म्हणाले.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक काल संपन्न झाली. यानंतर जगताप यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवारांना एकमुखी पाठिंबा देण्याचा ठराव बैठकीत करण्याचा आला. उपस्थित असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपला पाठिंबा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला असल्याची प्रतिज्ञापत्रं यावेळी लिहून घेण्यात आली.