आरंभ मराठी / धाराशिव
लोहारा पोलीस ठाण्यातील 2016 मधील बहुचर्चित लाचखोरी प्रकरणात मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती के. एम. एफ. खान (उमरगा) यांच्याकडून महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला असून, तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष बाबुराव गायकवाड (वय 43) व तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहूराज महादेव भीमाळे (वय 52) यांना ३ वर्षे सक्तमजुरी व ५,००० रुपयांचा द्रव्यदंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.
दिनांक 3 डिसेंबर रोजी कोर्टाने ही शिक्षा सुनावली. 2016 मध्ये हे प्रकरण भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील कलम 7, 12, 13(1)(ड), 13(2) अंतर्गत नोंद असून, तक्रारदार सुरेश गुंडेराव वाघ, रा. लोहारा यांनी शिक्षण संस्थेच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून देण्यासाठी आरोपींकडून 50,000 रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.
तक्रारीनुसार, आरोपी क्रमांक 1 संतोष गायकवाड यांनी पन्नास हजारांची मागणी केली, तर आरोपी क्रमांक 2 शाहूराज भीमाळे यांनी ती रक्कम स्वीकारली. तसेच आरोपी गायकवाड यांनी या व्यवहारास प्रोत्साहन दिल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले व तत्कालीन पोलीस उपअधीक्षक बी. व्ही. गावडे यांनी केला.
सरकारी पक्षाकडून सरकारी अभियोक्ता संदीप देशपांडे यांनी प्रभावीपणे पक्ष मांडला, तर आरोपींकडून अॅड. तोटला प्रवीण चंद्रा यांनी बाजू मांडली. न्यायालयाने उपलब्ध पुरावे, साक्षी व पंचनामा यांच्या आधारे दोन्ही आरोपी दोषी ठरवले.
त्यानुसार आरोपी क्रमांक 1 संतोष बाबुराव गायकवाड यांना 3 वर्षे सक्तमजुरी आणि 5,000 रुपये दंड तसेच आरोपी क्रमांक 2 शाहूराज महादेव भीमाळे यांनाही 3 वर्षे सक्तमजुरी आणि 5000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यामध्ये ट्रायल ऑफिसर म्हणून योगेश वेळापुरे, पोलीस उपअधीक्षक, ला. प्र. वि. धाराशिव यांना काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून विजय वगरे, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. धाराशिव, पो. हवा/ ए. एन. माने, पो. कॉ./627 पी. पी. भोसले यांनी काम पाहिले.








