आरंभ मराठी / धाराशिव
शहरातील शैक्षणिक परिसर असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ चौकात अखेर स्वतंत्र पोलीस चौकी मंजूर करण्यात आली आहे. तत्कालीन आमदार सुरेश धस यांनी यासंदर्भात विधान परिषदेत तारांकित प्रश्न विचारला होता.दरम्यान, या निर्णयामुळे शाळा, महाविद्यालय परिसरात सुरू असलेली टवाळखोरी आणि छेडछाडीतून होणाऱ्या वादाच्या घटना रोखण्यास मदत होणार आहे. तसेच या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठीही पोलिसांची मदत होणार आहे. ही पोलिस चौकी आनंद नगर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असेल.
धाराशिव शहरातील जिजाऊ चौक, तांबरी विभाग, शिक्षक कॉलनी परिसरात शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, वसतिगृह आहेत. त्यामुळे या भागात विशेषतः शाळकरी मुली,महाविद्यालयीन मुलींचे वास्तव्य आहे. मात्र, मुलींची छेड काढण्याचे आणि त्यातून दोन गटातील वादाचे प्रमाण वाढले आहे.
पालकांनी अनेकदा पोलिसांकडे तक्रारी केल्या. अपेक्षित कारवाया केल्या जात नाहीत. दुसरीकडे शिक्षण सुटण्याच्या भीतीने अशा त्रासाच्या घटनांबद्दल विद्यार्थिनी कुटुंबातही व्यक्त होत नाहीत. मात्र,त्यातून आत्महत्येसारख्या घटना घडू शकतात. टवाळखोरांचा बंदोबस्त व्हावा,अशी अपेक्षा पालकातून व्यक्त होत होती. मात्र,अपुरे संख्याबळ आणि त्यामुळे पोलिसांच्या कामाच्या मर्यादा, यामुळे अडचणी येत असल्याचा असा सूर निघत होता. या पार्श्वभूमीवर या भागात स्वतंत्र पोलीस चौकी मंजूर करावी, अशी मागणी केली जात होती.
अनेक वर्षापासून पोलिस चौकीचा विषय प्रलंबित होता. तत्कालीन आमदार सुरेश धस यांनी शासनाकडे पाठपुरावा करून विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून जिजाऊ चौकातील पोलीस चौकी मंजूर करावी, यासाठी भूमिका घेतली होती.या मागणीची दखल घेऊन शासनाने अखेर ही मागणी मान्य केली असून, अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी जिजाऊ चौक येथे पोलिस चौकी मंजूर करण्यात आल्याचे पत्र पोलिस अधीक्षक संजय जाधव यांना दिले आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर शहराला ही भेट असल्याचे मानले जात आहे. आनंद नगर पोलिस ठाण्यातील पोलिस स्टाफ या चौकीसाठी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या पोलीस चौकीमुळे या भागातील नागरिकांची अनेक वर्षापासून असलेली मागणी मान्य झाली असून, सुरेश धस यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
अप्पर पोलीस महासंचालकाचे असे आहेत आदेश
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांना महाराष्ट्र पोलीस नियमावली १९९९ भाग-१ (प्रशासन), मधील नियम क्र.४ (४) नुसार प्रदान असलेल्या अधिकारान्वये पोलीस अधीक्षक, धाराशिव यांना पोलीस ठाणे आनंदनगर अंतर्गत जिजाऊ चौक पोलीस चौकी निर्माण करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक, यांनी पोलीस ठाणे आनंदनगर येथील उपलब्ध मनुष्यबळामधून जिजाऊ चौक पोलीस चौकीस मंनुष्यबळ पुरवावे. तसेच चौकी सुरू’ करण्यासाठी आवश्यक तो आवती / अनायतों खर्च हा मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा, व त्याबाबतचा अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावा.