आ. राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
प्रतिनिधी / धाराशिव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय नाविन्यपूर्ण व महत्वकांक्षी योजना सुरू केली असून या योजनेनंतर्गत पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना त्यांचा व्यवसाय उभारण्यास व वृद्धीगत करण्यासाठी प्रशिक्षण, अवजारे व अर्थसहाय्य देण्यात येते. धाराशिव जिल्ह्यात या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवत, जिल्ह्यातील १५००० विश्वकर्मा कुटुंबांना प्रत्येकी १ लाख रुपयांचा लाभ मिळवून दिला जाणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
आमदार राणाजगजतसिंह पाटील यांनी सांगितले की, या योजनेनंतर्गत लोकांना केवळ कर्जच मिळणार नाही तर कौशल्य प्रशिक्षण व साहित्यही मिळणार आहे. लोहार, सोनार, कुंभार, सुतार, न्हावी, फुलारी, धोबी, शिंपी, मिस्त्री, चर्मकार, खेळणी बनवणारे, चावी बनवणारे,यांसारखी पारंपारिक कौशल्ये असलेल्या लोकांना पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळणार आहे. एकूण १८ पारंपरिक कामांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. योजनेचे महत्व व सर्वसामान्यांना होणारा लाभ विचारात घेवून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व बूथ प्रमुख या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता काम करणार असून प्रत्येक बूथ मधील किमान १० कारागिरांना तरी या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. प्रतिष्ठान भवन येथे योजनेची ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून कर्ज प्रकरण मंजूरीसाठी आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येणार आहे.
विनातारण कर्जपुरवठा
पारंपारिक कौशल्य असलेल्या व्यक्तींना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेअंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज टप्याटप्याने मिळू शकते. पहिल्या टप्प्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. यानंतर व्यवसाय विस्तारासाठी दुसऱ्या टप्प्यात २ लाख व पुढे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे. या कर्जासाठी फक्त ५ टक्के व्याज दर असून कुठलेही तारण लागणार नाही.
लाभार्थीना प्रशिक्षित करण्यासाठी ५ दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्या कालावधीत प्रतिदिन ५०० रुपये मानधन दिले जाणार आहे. याशिवाय पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र, ओळखपत्र, व १५००० रुपयांचे टूलकिट दिले जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.बारा बलुतेदारांसह पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा या योजनेचा उद्देश असून जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.