2025-26 च्या निधीला मंजुरी मिळण्याची शक्यता
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या 2024-25 च्या स्थगित निधीचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. बुधवारी होणाऱ्या समितीच्या बैठकीत या निधीबाबतची स्थगिती उठविण्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच 2025-26 या आर्थिक वर्षातील नव्या निधीच्या खर्चालाही मंजुरी मिळणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
विशेष म्हणजे, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी स्वतःच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती देत जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळणार असल्याचे सूचित केले आहे. गेल्या सात महिन्यांपासून जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. लोकप्रतिनिधींच्या ठरलेल्या सूत्रानुसार निधीचे वाटप न झाल्याने आमदार पाटील आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या कारभाराबाबत तक्रार केली होती.
यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांना निधी स्थगित करण्याचे आदेश दिले होते. परिणामी 2024-25 चा जिल्हा नियोजन निधी अडकून राहिला आणि अनेक विकासकामांना ब्रेक बसला. आधीच विकासाच्या शर्यतीत मागे असलेल्या धाराशिव जिल्ह्याच्या प्रगतीला या राजकीय संघर्षाचा मोठा फटका बसला होता.
आता बुधवारी होणाऱ्या बैठकीत 2024-25 च्या थांबवलेल्या निधीची स्थगिती उठवली जाईल, तसेच 2025-26 च्या निधीच्या वापरास देखील मान्यता दिली जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.