वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मदतीने जिल्ह्यातील 20 हजार हेक्टरवर होणार ‘ए आय’ चा वापर
उत्पादन खर्चात आणि पाण्यात होणार 30 टक्क्यांची बचत
आरंभ मराठी / धाराशिव
जिल्ह्यात ऊस उत्पादनात क्रांती घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे कृत्रिम बुद्धिमत्तेवर (ए आय) आधारित महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र 55 हजार हेक्टरहून अधिक असून, यापैकी 20 हजार हेक्टरवर ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादनात वाढ करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्पादन वाढवणे, खर्च कमी करणे, पाणी बचत आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
ऊस उत्पादनात एआय तंत्रज्ञानाचा वापर कृषी विज्ञान केंद्र, बारामती, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने सुरू करण्यात येणार आहे. एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ऊस उत्पादनात 40 टक्क्यांपर्यंत वाढ, पाणीवापरात 30 टक्केपर्यंत बचत, उत्पादन खर्चात 25-30 टक्के बचत, पारंपरिक पद्धतीपेक्षा 50-70 टक्के अधिक नफा, कीड व रोगांविषयी आगाऊ माहिती मिळणे अशा पद्धतीचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
या प्रकल्पासाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर खर्च अपेक्षित आहे. यापैकी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट 9250 रुपये, संबंधित साखर कारखाना 6750 रुपये तर शेतकऱ्यांचा वाटा 9000 रुपये असणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील एक लाख शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे.
हे अर्ज ‘पहिले येईल त्याला प्राधान्य’ या तत्त्वावर स्वीकारले जाणार आहेत. यामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करणारे शेतकरी, एकाच प्रकारची जमीन असलेले गटबद्ध शेतकरी (25-40 शेतकरी गट) यांना प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी शेतकरी सदस्य असलेल्या कारखान्यांकडे तात्काळ करारनाम्याची प्रत सादर करणे आवश्यक आहे.
तसेच एआय प्रणालीत हवामान केंद्र आणि मातीतील सेन्सरद्वारे पाणी व्यवस्थापन, अन्नद्रव्य नियंत्रण, कीड व रोग व्यवस्थापन याबाबत अचूक मार्गदर्शन मिळणार आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्प अंमलबजावणीसंदर्भात बैठक गुरुवारी (दि.10) पार पडली. या बैठकीला नॅचरल शुगरचे बी.बी.ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, जिल्हा उपनिबंधक पांडुरंग साठे तसेच 16 साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुजार यांनी प्रत्येक साखर कारखान्याने किमान 250 शेतकरी आणि 20 टक्के क्षेत्र (20000 हेक्टर) या प्रकल्पांतर्गत आणण्याचे उद्दिष्ट जाहीर केले. शेतकऱ्यांचे करार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडे तात्काळ सादर करून शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
एआय तंत्रज्ञानामुळे ऊसशेतीत होणारे फायदे
– ऊसाच्या उत्पादनात 40% वाढ होणार
– जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत
– खतांच्या वापरात सुमारे 30% घट
– उत्पादन खर्चात 20 ते 40 टक्क्यांची बचत
– सुमारे ३० टक्के पाण्याची बचत
– शेतकऱ्यांना पीक पद्धतीबद्दल अचूक सूचना
– साखर उतारा 0.5 ते 2% ने वाढवणं शक्य
प्रयोगशील शेतकऱ्यांना मोठी संधी
ऊस उत्पादनात एआय चा वापर करून शेतकऱ्यांना उत्पादनात भरघोस वाढ करता येईल. शिवाय यामुळे उत्पादन खर्च कमी होणार आहे. ज्या कारखान्याचे शेतकरी सभासद आहेत, त्या कारखान्याकडे शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज करावेत. जो प्रथम अर्ज करेल त्याला याचा लाभ मिळणार आहे. कारखाना आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे खर्चाचा बराचसा भाग उचलणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च खूप कमी होणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऊसामध्ये ठिबक सिंचन असणे अनिवार्य आहे. ऊस उत्पादनात प्रयोगशील शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना ही मोठी संधी आहे.
रवींद्र माने
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव.