- चंद्रसेन देशमुख, धाराशिव
भाज्यांची सजावट ज्या कोथिंबिरीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, तिने मुंबईकरांच्या भाज्यांमध्ये चव निर्माण केलीच; पण याच कोथिंबिरीचं उत्पादन घेणाऱ्या गावकऱ्यांचंही जीवन बदलून टाकलं. गावातल्या प्रत्येकाला लखपती बनवून कोथिंबीरीने अल्प खर्चात मुबलक उत्पन्नाचा मंत्रच गावकऱ्यांना दिला. धाराशिव तालुक्यातील भंडारी या छोट्याशा खेड्यातली ही यशकथा. गेल्या १५ वर्षातला हा बदल. खास कोथिंबिरीच्या वाहतुकीसाठी गावकऱ्यांनी सुमारे ३५ आयशर टेम्पो घेतले आहेत, हे विशेष.
धाराशिव शहरापासून ३० किलोमीटरवरच्या भंडारीमध्ये कुणी शेतकरी पेरणीच्या तर कुणी कोथिंबीर काढणीच्या कामात मग्न आहेत. दिवसभर काढणी, बांधणी करून सायंकाळी टेम्पो मुंबईच्या दिशेने रवाना होतो. आणि दरवळणाऱ्या कोथिंबिरीच्या सुवासात शेतकऱ्यांची सायंकाळ सुसह्य होते. हे नगदी पीक. त्यात गुंतवणूक कमी. त्यामुळे शेतकऱ्यांना हा व्यवसाय लाभाचा ठरत आहे. भंडारीत १२०० शेतकरी आहेत. जवळपास प्रत्येक कुटुंबात कोथिंबिरीचं उत्पन्न घेतलं जातं. अवघ्या ४० – ४५ दिवसांत कोथिंबीर काढणीला येते. आणि रान (जमीन) दुसऱ्या पिकासाठी सहज तयार करता येतं. त्यामुळे शेतकरी या पिकाकडे अधिकच वळू लागले आहेत. कितीही मोठ्या प्रमाणावर उत्पन्न निघालं तरी त्याचा दरावर परिणाम होत नाही. अलीकडे तर गावातच व्यापारी तयार झाल्यामुळे बांधावर उभं राहून कोथिंबिरीचा सौदा केला जातो. काढणीचा खर्चही व्यापारीच करतात. शिवाय कोथिंबीरकाढणीपूर्वीच पैसेही मिळतात.
काळ्याभोर जमिनीचं शिवार, ही भंडारीची जमेची बाजू. पण, निसर्गाच्या बेभरवशामुळे इथले शेतकरी हवालदिल होते. कामेगाव, कास्ती आदी खेड्यातून दोन छोटे टेम्पो भरून मुंबईच्या बाजारात पालेभाज्या जात होत्या. हे १५ वर्षापूर्वीच चित्र. त्यानंतर भंडारीतील काही शेतकऱ्यांनी कोथिंबिरीची पेरणी केली. या टेम्पोतूनच कोथिंबीर मुंबईला पाठविण्यात येऊ लागली. कोथिंबिरीची गुणवत्ता आणि मुंबईच्या बाजारपेठेत मिळणारी मागणी लक्षात घेऊन मुंबईच्या काही व्यापाऱ्यांनी भंडारी गाव गाठलं. त्यांनी शेतकऱ्यांना कोथिंबिरीचं उत्पादन घेण्यास उद्युक्त केलं. हळहळू उत्पादन वाढलं. इथले टेम्पोचालकच आता व्यापारी झाले आहेत. गावातून कोथिंबीरीचे फड विकत घेऊन ते त्याच्या जुड्या मुंबईच्या बाजारात पोचवतात. जुलै महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत कोथिंबीरीचे उत्पन्न टप्प्या-टप्प्याने घेतलं जातं. काही शेतकरी बारमाही हे पीक घेतात.
बाजारात कोथिंबीरीच्या दराचा चढ-उतार लक्षात घेऊन व्यापारी शेतकऱ्यांच्या कोथिंबीरीचा दर ठरवितात. पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांच्या दरम्यान कोथिंबीर काढणीला येते. एकरवर हा दर ठरतो. यावर्षी बाजारपेठेत कोथिंबिरीला चांगला दर मिळाला. त्यामुळे ५० हजार ते दीड लाख रुपयाला एकरभर कोथिंबीर विकली गेल्याचं शेतकरी प्रदीप पाटील यांनी सांगितलं. पाटील यांच्याकडे सर्वाधिक म्हणजे १० एकर कोथिंबीर आहे. कोथिंबीरीशिवाय ते अन्य उत्पन्न घेत नाहीत. पूर्वी उडीद-मुगाची शेती करत असताना अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हतं. मात्र कोथिंबिरीमुळे चांगली प्रगती झाल्याचं ते सांगतात. यावर्षी १० एकरातून १२ लाख रुपयांची कोथिंबीर निघाल्याचं त्यांनी सांगितलं.
Chandrasen Deshmukh