प्रतिनिधी / धाराशिव
गावकऱ्यांच्या प्रचंड विरोधानंतर 2018 मध्ये त्रासदायक ठरत असलेल्या धाराशिव तालुक्यातील पिंपरी शिवारातील हाडाच्या कारखान्यांना प्रशासनाने सील ठोकले होते. त्यामुळे वर्षानुवर्षांपासून सुरू असलेले हाडाच्या भुकटीचे कारखाने बंद होऊन गावकऱ्यांचा त्रास थांबला झाला होता.मात्र कारखाने पुन्हा सुरू करण्यात आले असून, त्यामुळे पिंपरीकरांचा जीव कासावीस होत आहे. दरम्यान या भागात मतदान यंत्राच्या गोडाऊन कदडे प्रशासकीय कामासाठी अधिकारी गेल्यानंतर दुर्गंधीचा त्रास जाणवला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी सूचना देऊन कारखान्यातील हवेच्या प्रदूषणाची पातळी तपासण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणी सुरू केली आहे.
धाराशिव तालुक्यातील पिंपरी शिवारात गेल्या अनेक वर्षांपासून हाडापासून भुकटी तयार करण्याचा कारखाने सुरू होते.दुर्गंधीच्या प्रचंड त्रासामुळे गावकऱ्यांनी कारखान्याच्या विरोधात आवाज उठवला आणि प्रशासनाने 2018 मध्ये हे कारखाने बंद केले.मात्र सील करण्यात आलेले हे कारखाने पुन्हा एकदा सुरू झाले असून पुन्हा एकदा गावकऱ्यांना त्रास सुरू झाला आहे. हवेसोबत शिवारात दुर्गंधी पसरून शेतकऱ्यांनाही त्रास होतो. हे कारखाने गावकऱ्यांना त्रासदायक ठरत असले तरी कारखानदारांच्या दबावामुळे कुणीही तक्रारीसाठी पुढे येत नाही. शिवाय प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी देखील या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहेत. जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांना हा प्रकार समजताच त्यांनी तातडीने हवेतील प्रदूषणाची पातळी तपासण्याच्या सूचना केल्या आहेत.त्यामुळे मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाने सकाळपासूनच या भागातील हवेच्या प्रदूषणाची पातळी तपासण्याचे काम सुरू केले. सायंकाळपर्यंत ही तपासणी सुरू होती. हवेतील प्रदूषणाच्या पातळीचा अहवाल लवकरच सादर होऊन कारखान्याविरुद्ध कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हाडांची भुकटी,कातडी शिजवून केली जाते प्रक्रिया
कारखान्यांमध्ये जनावरांची कातडी, हाडे आणून सुकवली तसेच शिजवली जातात. हाडांपासून भुकटी तयार केली जाते तर कुजलेल्या व शिजवलेल्या कातडीपासून द्रव काढला जातो,असे सांगण्यात येते. ही भुकटी व द्रव पुणे – मुंबईला पाठवला जातो.कारखान्याच्या परिसरात पसरलेल्या या हाडं आणि मांसामुळे नागरिकांना मात्र प्रचंड त्रास होत आहे.