अर्थसंकल्पात धाराशिव जिल्ह्याच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न,
आता सरकार एक एक हजार रुपयाने विकास करणार का..?
आरंभ मराठी / धाराशिव
राज्याचा 2025-2026 चा अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला असून, या अर्थसंकल्पात धाराशिव जिल्ह्याची शासनाने अक्षरशः थट्टा केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील तीन महत्वाच्या प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांची गरज असताना अर्थसंकल्पात मात्र केवळ एक हजार रुपयांची तरतूद केली आहे. अशाने जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष कसा भरून येणार हा प्रश्न निर्माण होत आहे.
———————————–
अर्थसंकल्पातून राज्याला दिशा देण्याचे काम केले जाते. धाराशिव सारख्या आकांक्षीत आणि सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेल्या जिल्ह्याला अर्थसंकल्पातून भरीव आणि शाश्वत काहीतरी मिळेल ही अपेक्षा होती. परंतु, राज्य सरकारने धाराशिव जिल्ह्याची थट्टा केल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. मागील वर्षी जिल्ह्याला पाचशे बेडचे रुग्णालय मंजूर झाले होते.
त्यासाठीचा खर्च साडेतीनशे कोटींपेक्षा अधिक आहे. या रुग्णालयासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात केवळ एक हजार रुपयांची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे हे रुग्णालय मंजूर झाल्यानंतर त्याचे उद्घाटन करण्यासाठी एक हजारांपेक्षा अधिकचे नारळ फोडले असतील. माजी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी परंडा तालुक्यातील अनाळा येथे 22 कोटी रुपये किंमतीचे ट्रॉमा सेंटर मंजूर केले होते. त्यासाठी देखील या अर्थसंकल्पात एक हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणात तुळजापूर येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीचा उल्लेख करण्यात आला होता. या इमारतीसाठी 31 कोटी रुपयांची गरज असताना राज्य सरकारने अर्थसंकल्पात केवळ एक हजार रुपयांची तरतूद केली आहे. कृष्णा – मराठवाडा सिंचन प्रकल्प हा धाराशिव जिल्ह्यासाठी कायम जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. सुरुवातीला 4700 कोटी रुपये किंमत असलेल्या या प्रकल्पाचा सध्याचा खर्च 12000 कोटीपर्यंत गेला आहे.
या प्रकल्पाची किंमत दरवर्षी दहा टक्के वाढत आहे. त्यामुळे भरीव तरतूद करून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देणे सरकारचे काम आहे. परंतु, यावर्षी या प्रकल्पासाठी केवळ 600 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील 30 टक्के रक्कम कपात करून केवळ 420 कोटी रुपये खर्चासाठी मिळणार आहेत. मागील वर्षी या प्रकल्पासाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यातील फक्त 350 कोटी यावर खर्च करण्यात आले. कृष्णा – मराठवाडा सिंचन प्रकल्पाची किंमत पुढच्या दोन वर्षात 15000 कोटी पर्यंत वाढणार आहे. अपुऱ्या निधीमुळे हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होणार याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.
धाराशिव – तुळजापूर – सोलापूर या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या प्रकल्पासाठी एक रुपयाची देखील तरतूद न केल्यामुळे याचेही पुढचे काम रेंगाळत राहील अशी शक्यता आहे. जिल्ह्यातील कौडगाव, तामलवाडी आणि वडगाव या नवीन एमआयडीसी साठी देखील एकही रुपयाची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पातून धाराशिव जिल्ह्याला नेमके काय मिळाले? हा प्रश्न निर्माण होत आहे. राज्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असणारा जिल्हा आणि देशातील क्रमांक तीनचा आकांक्षीत जिल्हा ही नकोशी ओळख पुसण्यासाठी राज्य पातळीवरून काहीच प्रयत्न होत नसल्यामुळे धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष नेमका कसा भरून काढायचा याचे उत्तर मिळत नाही.