प्रतिनिधी / धाराशिव
धाराशिव शहरातील विविध भागात चिखल आणि पाण्याचे डबके साचले आहे. नागरिकांचे प्रचंड हाल सुरू असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांना चिखलातून मुक्त करण्यासाठी पालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेषतः शहरातील प्रभाग चारमधील नागरिकांच्या वतीने मोर्चाचे नियोजन करण्यात आले असून, प्रशांत साळुंके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. समस्येतून बाहेर पडण्यासाठी एकदा घराबाहेर पडून मोर्चात सहभागी व्हा,असे आवाहन साळुंके यांनी केले आहे.
साळुंके यांनी म्हटले आहे की, विशेषतः प्रभाग क्रमांक चारला चिखलातुन बाहेर काढण्यासाठी एकत्र येऊन मोर्चा काढत आहोत.यामध्ये नागरिक, विद्यार्थी, महिला,युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. प्रभाग क्रमांक चारमधील जनतेची खुप दिवसापासून चिखलामध्ये पायपीट सुरु आहे. चिखलामुळे अनेक अपघात होत आहेत.समाजसेवक म्हणून खूप प्रयत्न केले. पण काही उपयोग होत नाही.झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी सोमवार,31 जुलै रोजी नगर पालिकेवर मोर्चा काढून नागरिकांच्या वतीने निवेदन सादर करण्यात येणार आहे. दुपारी साडेबारा वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीपासून मोर्चाची सुरुवात होईल.आपला त्रास कमी करण्यासाठी एकदा तरी घराबाहेर पडून नागरिकांनी पालिकेला जाब विचारला पाहिजे,अशी भूमिका साळुंके यांनी व्यक्त केली आहे.