प्रतिनिधी / धाराशिव
शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि नगर पालिकेकडून होत असलेले दुर्लक्ष, यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल सुरू झाले होते.शिवसेनेने केलेेले आंदोलन, नागरिकांचा वाढलेला संताप आणि लोकप्रतिनिधींकडून केल्या गेलेल्या सूचनांमुळे शहरातील चिखलमय रस्त्यांची दुरूस्ती सुरू झाली आहे. वेगवेगळ्या भागात मुरूम टाकून रस्त्यांची दुरूस्ती सुरू करण्यात आली आहे. त्यामळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळू लागला आहे.
शहरात नगर पालिकेमार्फत भूयारी गटार योजनेची कामे सुरू आहेत. या कामानंतर रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. योजनेच्या कामानंतर रस्त्यांची तातडीने दुरूस्ती होणे अपेक्षित असताना पालिकेकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी नागरिकांना समस्येला तोंड द्यावे लागत आहे. नगर पालिकेकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात होता तर शिवसेनेच्या वतीने चिखलात बसून आंदोलन करण्यात आले. शहर शिवसेनेच्या आंदोलनानंतर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे यांनीही अंगाला चिखल लावून नगर पालिकेवर मोर्चा काढला तसेच प्रभाग चारमधील काही नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढत जाब विचारला. याच प्रभागातून 31 तारखेला पालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. दुसरीकडे नागरिकांकडूनही संताप व्यक्त करण्यात येत होता.
शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सूरज साळंुके यांनीही नगर पालिकेकडे पाठपुरावा करून शहरातील रस्त्यांची दुरूस्ती करण्यासाठी पुढाकार घेतला तर लोकप्रतिनिधींही पालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या.त्यामुळे चार दिवसांपासून पालिकेकडून रस्ते दुरूस्तीच्या कामाला वेग दिला जात आहे. काही भागात काळी माती काढून त्याजागी मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे.तर अनेक ठिकाणी खड्डे भरले जात आहेत.
आकाशवाणी केंद्रासमोरील रस्त्यासह जिजाऊ चौक, जिजाऊ नगर, मुकूंद नगर, लक्ष्मी कॉलनी, सिरीन कॉलनी, गालीब नगर आदी भागातील कामे हाती घेण्यात आली आहेत. पालिकेने भूयारी गटारच्या योजनेसाठी नवीन खोदकाम थांबवून चिखल झालेल्या भागाातील कामाची दुरूस्ती करण्यावर भर द्यावा, अशी मागणी होत आहे.