प्रतिनिधी / धाराशिव :
शहरात सध्या ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचलेले आहेत. नगर पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. शहरातील नाल्या गाळाने तुडुंब भरलेल्या आहेत. त्यामुळे शहरात तत्काळ स्वच्छता मोहीम राबवावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात कचरा टाकून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या ( ठाकरे गट) वतीने देण्यात आला आहे .
सेनेने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, शहरात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून रोगराई पसरत आहे. नगर पालिकेतील कर्मचारी शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी काम करीत आहेत. त्या कर्मचाऱ्यांनी नगर पालिका सफाई विभागात कार्य करणे आवश्यक आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात नगर पालिका प्रशासनास १५ व्या वित्त आयोगाचा निधी न मिळाल्यामुळे शहर स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी संपुर्ण शहरातील नाले सफाई होणे आवश्यक आहे. १५ व्या वित्त आयोगाचा निधी न मिळाल्यामुळे नगर पालिका प्रशासनास लाईट बिल भरणे अशक्य झाले आहे. त्यामुळे पाणी पुरवठयाचा विद्युत पुरवठा सतत खंडीत करण्यात येत आहे. यामुळे शहराला १० ते १५ दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. तसेच घंटा गाडी प्रभागामध्ये १० ते १५ दिवस फिरत नाही. त्यामुळे नागरीकांनी कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. शहराची स्वच्छता व पाणी पुरवठा सुरळीत करणेबाबत ८ दिवसात निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील कचरा आणून टाकून न आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर नपचे माजी गटनेते सोमनाथ गुरव, रवि वाघमारे, प्रविण कोकाटे,पंकज पाटील, तुषार निंबाळकर, गणेश खोचरे, निलेश साळुंके, सुरेश गवळी, बाळासाहेब काकडे, दिनेश बंडगर , राज निकम, नाना बोंदर, सागर शेरकर,सुमित बागल, संकेत सूर्यवंशी, मुजीब काझी, साबेर सय्यद, अफरोज पिरजादे, गफूर शेख, सुमीत बागल, संकेत सूर्यवंशी,हनुमंत यादव यांची स्वाक्षरी आहे.