प्रतिनिधी / धाराशिव
एका शिक्षकाला पाच जणांकडून हॉकी स्टीक, चेन, काठी,लाथा बुक्क्याने बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार धाराशिव शहरात घडला होता.या प्रकरणी धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयाने तीन आरोपींना सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण राज्यात गाजले होते.न्यायाधीश अंजु शेंडे यांनी या खटल्याचा आज निकाल दिला.
धाराशिव शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलचे शिक्षक रवी माने यांना 6 जानेवारी 2016 रोजी शहरातील 5 जणांनी हॉकी स्टिक, काठी, चेन व लाथा-बुक्क्याने बेदम मारहाण केली होती.यात रवी माने हे गंभीर जखमी झाले होते. माने यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.यापैकी एक आरोपीचे निधन झाल्याने त्यांचे नाव वगळण्यात आले होते. तर दुसरा आरोपी अल्पवयीन होता. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही या प्रकरणात कठोर कारवाई व्हावी,अशी मागणी केली होती.
दरम्यान शहर पोलिसांनी या प्रकरणात प्रमुख जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.न्यायालयाने दोन्ही बाजू तपासून तसेच समोर आलेले पुरावे आणि सरकारी अभियोक्ता नरवाडकर मॅडम यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सचिन लाकाळ,उमेश कोकणे आणि मोहम्मद शेख यांना सहा महिन्यांचा कारावास तसेच प्रत्येकी 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.