अवघ्या काही चार आरोपी ताब्यात; तीन फरार
आरंभ मराठी / तुळजापूर
धाराशीव तालुक्यातील कावलदरा (बावी) परिसरात धुळे -सोलापूर महामार्गावर आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी चारचाकी वाहनांना अडवून वाहनांमधील प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याजवळील किंमती वस्तू लुटल्याची धक्कादायक घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ माजली होती.
याबाबत धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी तात्काळ वेगवान तपास करत लुटणाऱ्या टोळीतील चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासात आरोपींना पकडले. विशेष म्हणजे याच टोळीने रात्री नळदुर्ग भागात ६ शेळ्या आणि काही वाहनातील डिझेलची चोरी केली होती.
या टोळीतील चार आरोपींना पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडीसह येडशी टोल नाका येथे ताब्यात घेतले. आरोपींकडून नळदुर्ग येथून चोरलेले डिझेल आणि सहा शेळ्या देखील यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतल्या. हे आरोपी तेरखेडा परिसरातील गंभीर गुन्ह्यातील आरोपी असून, यापूर्वीही त्यांनी अशाच प्रकारची लूटमार केल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, या टोळीतील इतर तीन आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
धाराशिव तालुक्यातील कावलदरा येथे धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तोंडाला मास्क लावलेल्या चोरांच्या टोळीने रस्त्यावर दगड व जॅक टाकुन रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला.
रोडवरील गाडीचा वेग कमी होताच चार ते पाच चारचाकी वाहनांचे टायर फोडून गाडीतील प्रवाशांना मारहाण करुन गाडीतील चोरट्यानी प्रवाशांकडील आयफोन, लॅपटॉप, पैसे, सोन्याचे दागिने लुटले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ही घटना पहाटे चार वाजता घडल्यानंतर अगदी काही वेळात पोलिसांना याची खबर लागली. घटना घडल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात तुळजापूर पोलिस स्टेशनचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची गाडी येत असल्याचे समजताच चोरटे पसार झाले.
या घटनेमुळे ज्यांच्या गाड्या अडवण्यात आल्या होत्या ते प्रवासी भयभीत झाले होते. पोलिसांनी तात्काळ याचा तपास करत लूटमार करणाऱ्या टोळीचा शोध घेतला. अवघ्या तीन तासात या टोळीतील चार जणांना ताब्यात घेण्यात यश आले.
परंतु, यातील तीन आरोपी पळून जाण्याचा यशस्वी झाले. पळून गेलेल्या आरोपींचा धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेळके आणि त्यांचे पथक पथक शोध घेत आहे.