प्रतिनिधी / धाराशिव
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एक वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे गटाने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून तसेच शिवसैनिकांकडून शपथपत्र लिहून घेतले होते. त्यातून ‘आम्ही ठाकरे गटासोबतच आहोत’हे दाखविण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला होता. आता याच धोरणाची पुनरावृत्ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून केली जात आहे. गेल्या दोन दिवसात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांकडून शपथपत्र लिहून घेतले असून,शेकडो शपथपत्र घेऊन प्रमुख पदाधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत.आजच्या मेळाव्यात हे पदाधिकारी पक्ष कार्यालयाला शपथपत्र सादर करतील.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे ‘आम्ही शरद पवार sharad pawar साहेबांसोबतच. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार यांच्या आदर्शवर आणि तत्त्वावर माझी बिनशर्त निष्ठा ठेवतो.’असा मजकूर असलेले शेकडो शपथपत्र लिहून घेतले असून, हे शपथपत्र घेऊन युवकचे पदाधिकारी मंगळवारी रात्री मुंबईला रवाना झाले. आज मुंबईत शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही गटांनी मुंबईत कार्यकर्ता मेळावे आयोजित केले आहेत. या मेळाव्यात कुणाची निष्ठा कुणावर, हे दिसून येणार आहे. कोण पदाधिकारी कोणाच्या बाजूने, हेही स्पष्ट होईल. मात्र, या धडपडीत सर्वसामान्य कार्यकर्ता संभाव्य घडामोडींकडे लक्ष ठेवून आहे.
काय लिहिले शपथपत्रात?
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून लिहून घेतलेल्या शपथपत्रात म्हटले आहे की, ‘आम्ही शरद पवार साहेबांसोबतच. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार यांच्या आदर्शवर आणि तत्त्वावर माझी बिनशर्त निष्ठा ठेवतो.मी असेही सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जयंत पाटील jayant patil हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व मेहबूब शेख mahebub shaikhहे युवक प्रदेशाध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या व रोहीत पवार rohit pawar नेतृत्वाचा यांच्या नेतृत्ववर माझा मनापासून बिनशर्त पाठिंबा आहे.’ यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, शहराध्यक्ष आयाज बबलू शेख, युवक प्रदेश सचिव रोहित बागल, तालुका उपाध्यक्ष जयंत देशमुख, शहर उपाध्यक्ष राजकुमार पवार, माजी नगरसेवक बाबा मुजावर, युवा नेते रणवीर इंगळे, पंकज भोसले, पृथ्वीराज मुळे, कुणाल कर्णवार,युवक तालुका सरचिटणीस शिवशांत काकडे,प्रशांत सोनटक्के अनिकेत साबळे आदी उपस्थित होते.
शिवसेनेनेही दिले होते शपथपत्र, पण सोयीनुसार भूमिका बदलली
एक वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड झाल्यानंतर कायदेशीर लढाईसाठी म्हणून सुरुवातीला शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यानंतर शिंदे गटाने गावागावांतून हजारो शपथपत्र लिहून घेतले होते. अनेक प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिकांनी शपथपत्र लिहून दिले.पण लिहून देणाऱ्या अनेकांनी कायदेशीर कारवाई सुरू होण्यापूर्वीच आपल्या सोयीचे मार्ग पत्करले आणि भूमिका बदलली.केवळ स्थानिक पातळीवर नव्हे तर राज्य स्तरावरील अनेकांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केले.त्यामुळे आता शरद पवारांवर प्रेम,निष्ठा दाखविणारे,शक्ती प्रदर्शनात सहभागी होणारे राज्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते अखेरपर्यंत याच गटात राहतील का,हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.