संजय राऊत यांच्या स्पष्टीकरणाने महाविकास आघाडीत गोंधळ
आरंभ मराठी / धाराशिव
महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला जागा सुटण्याची आशा असतानाच शिवसेना उबाठा गटाने भूम-परंड्यातून माजी आमदार स्व.ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे माजी आमदार राहूल मोटेंना धक्का मानला जात आहे, मात्र प्रसिध्द झालेल्या यादीत दुरूस्ती करण्यात येणार असल्याचे सुतोवाच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार राहूल मोटे यांनाच भूम-परंडा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार,अशी मोटे समर्थकांना आशा आहे.
भूम-परंड्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा दावा असलेली जागा एकनिष्ठ माजी आमदार राहूल मोटे यांनाच महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळेल, अशी शक्यता असतानाच अचानकपणे माजी आमदार स्व.ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील यांच्या नावाची घोषणा शिवसेना उबाठा गटाने केली.
त्यामुळे राहूल मोटे समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. उबाठा गटाने भूम-परंड्यासह राज्यातील 5 ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचा दावा असणाऱ्या जागांवर उमेदवार घोषित करून टाकल्याने महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. शिवसेनेची यादी जाहीर होताच प्रसार माध्यमांसमोर आलेल्या संजय राऊतांनी यादीमध्ये दुरूस्ती होणार असल्याचे सांगत उमेदवारीत पुन्हा बदल होतील, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे निराश झालेल्या राहूल मोटे समर्थकांना उमेदवारीची आशा निर्माण झाली आहे.मात्र, जाहीर केलेल्या यादीत शिवसेना बदल करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.