ओमराजेंना 3 लाख 16 हजारांची लीड
आरंभ मराठी / धाराशिव
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर तब्बल तीन लाखांच्या मताधिक्याने विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांचे हे मताधिक्य महाराष्ट्रातील सर्वात जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत ओमराजे मोदींच्या लाटेत निवडून आले, अशी टीका करणाऱ्या भाजपला त्यांनी जोरदार चपराक दिली असून, वाराणसीमधून मोदींना दीड लाखांचे मताधिक्य मिळाले तर ओमराजे यांना तीन लाखांवर मताधिक्य मिळाले आहे. म्हणजे मोदींच्या मताधिक्यपेक्षा ओमराजे निंबाळकर यांचे मताधिक्य दुप्पट आहे. अजूनही त्यांच्या मतात वाढ होण्याची शक्यता आहे.
उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय होती. ही जागा महाविकास आघाडीतून ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे होती. गेल्या पाच वर्षात विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी थेट लोकांशी ठेवलेला संपर्क, फोनवरून केलेली कामे आणि एकूणच सरकारच्या विरोधात असलेला रोष,यावरून या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर निवडून येतील,असा सर्व सामान्यांना विश्वास होता.
तुलनेने महायुतीचा उमेदवार ऐनवेळी जाहीर झाल्याने उमेदवाराला तयारीसाठी अपेक्षित वेळ मिळाला नाही आणि सरकारच्या विरोधात असलेली लाट अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीत दिसून आली.
त्यांची अभूतपूर्व उत्साहात विजयी मिरवणूक काढण्यात येत आहे. धाराशिव शहरात जागोजागी त्यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव करण्यात येणार असून, तशी तयारी करण्यात आली आहे.
मोदींच्या लाटेचा उलटा परिणाम
2019 च्या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारले अशी टीका भाजपकडून केली जात होती. यावेळी मात्र नरेंद्र मोदी यांची लाट ओसरली असून, त्यांच्या सरकारबद्दल नाराजीची भावना मतदारांच्या मनात दिसून येत होती.दुसरीकडे ओमराजे निंबाळकर यांचा थेट लोकांशी असलेला संपर्क, फोनच्या माध्यमातून लोकांचे सोडवलेले प्रश्न यामुळे त्यांनी निवडणुकीत सहज यश संपादन केले. साक्षात मोदींनी माझ्या विरोधात निवडणूक लढवली तरी मीच निवडून येईल,असा ठाम विश्वास ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला होता.