आरंभ मराठी Breaking
जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित मिळणार हप्ते, आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातून 1 लाख 79 हजार महिलांचे अर्ज प्राप्त,1 लाख 70 हजार अर्ज पात्र
सज्जन यादव / आरंभ मराठी
धाराशिव ; सध्या गावापासून शहरापर्यंत फक्त ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचीच चर्चा आहे. ग्रामपंचायत कार्यालय, तहसील ते सीएससी केंद्र प्रत्येक ठिकाणी महिलांची गर्दी दिसून येत आहे. या योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत. मात्र आता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे ॲप बंद करण्यात आल्याने अर्ज न भरलेल्या जवळपास सव्वा लाख महिलांची अडचण झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील 1 लाख 79 हजार महिलांनी अर्ज केले आहेत. यापैकी 1 लाख 70 हजार अर्ज योजनेसाठी पात्र ठरले आहेत तर 9 हजार अर्जामध्ये थोड्याफार त्रुटी निघाल्या आहेत. या त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे. या अर्जाची पडताळणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक अशा 8 समित्या गठित केल्या आहेत. राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर म्हणजे 19 ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यावर दीड हजार रुपयांचे जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते एकत्रित जमा करण्यात येणार असल्याची खात्रीपूर्वक माहिती आहे.
ज्या महिलांनी योजनेसाठी ऑफलाइन नोंदणी केली आहे त्या प्राप्त अर्जाची पडताळणी तालुकास्तरावर करण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली करण्यात आली होती. धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यात आठ समित्या गठित केल्या आहेत. या समित्यांनी कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. अंतिम यादी तयार करून लाभ वितरणाची तयारी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील लाभार्थीच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दीड-दीड हजाराचे दोन हप्ते एकदाच वर्ग केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ स्तरावरून मिळाली. याबाबतचे नियोजन प्रशासकीय पातळीवर वेगाने सुरु होते.दोन दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने प्राप्त पैकी पात्र ठरलेल्या 1 लाख 70 हजार अर्जाना मंजुरी देऊन शासनाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले आहेत.
आचार संहितेपूर्वी तीन हप्ते वितरित होणार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेसाठी कलेक्टरपासून ते अंगणवाडी सेविकांपर्यंत सर्वांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. इतर कामे मागे ठेवा पण या योजनेचे काम प्राधान्याने पूर्ण करा असे आदेशच देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व प्रशासन याच कामाच्या मागे असल्याचे चित्र दिसत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात लागू शकते. त्यामुळे 19 ऑगस्ट रोजी जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते एकदाच वितरित केले जाणार आहेत. तर सप्टेंबरमध्ये आचार संहिता लागू होण्यापूर्वी तिसरा हप्ता देखील वितरित करण्यासाठी शासनाचे प्रयत्न असणार आहेत. त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी वेगवान असल्याचे दिसून येते.
3 लाख महिलांना योजनेचा लाभ
जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 79 हजार महिलांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी 1 लाख 70 हजार अर्ज पात्र ठरले आहेत. उर्वरित अर्जांची फेरतपासणी केली जाईल. ॲप बंद झाल्यामुळे उर्वरीत महिला अर्ज करू शकत नाहीत. त्यामुळे याबद्दल शासनाला कळविण्यात आले आहे. आपल्या जिल्ह्यात एकूण 3 लाख महिला योजनेसाठी लाभ घेऊ शकतील असा अंदाज आहे.
डॉ.सचिन ओंबासे, जिल्हाधिकारी,धाराशिव