प्रतिनिधी / धाराशिव
आरक्षणासाठी मुंबईत दीड महिन्यापासून ठाण मांडून बसलेल्या समाजबांधवांची सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने मराठा समाजातून तीव्र संतापाची लाट उसळली असून, या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले जाणार आहे. मुंबईत आंदोलनासाठी बसलेल्या बांधवांना पाठिंबा देण्यासाठी क्रांतिदिनी म्हणजे 9 ऑगस्ट रोजी राज्यातील मराठे मोठ्या संख्येने मुंबईतील आझाद मैदानावर दाखल होणार आहेत. यासंदर्भात रविवारी सकाळी धाराशिव शहरात समाजबांधवांची बैठक पार पडली, यावेळी ही माहिती देण्यात आली.
तुळजापूर ते मुंबई महिनाभर पायी प्रवास करून वनवास यात्रा काढलेल्या मराठा तरुणांनी ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने समाजबांधवांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळी धाराशिव शहरात यासंदर्भात समाजबांधवांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत तरुणांनी सरकारच्या वेळकाढूपणाबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच मराठा समाजबांधवांकडून मुंबईत क्रांतिदिनी एकत्र येऊन व्यापक आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यावेळी मराठा तरुणांची मोठी उपस्थिती होती.
पुन्हा एकदा मराठा क्रांती ठोक मोर्चा ?
मराठा आरक्षणाचा लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा मराठा ठोक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी तरुणांनी दिला. तरुण म्हणाले, टास्क फोर्स नको, आरक्षण हवं आहे.मेगा भरती स्थगित करा, आधी आरक्षण मगच भरती करा,समांतर आरक्षणाचा 2014 प्रमाणे नवीन शासन निर्णय जाहीर करा, SEBC TO EWS मध्ये अडकलेल्या MPSC व इतर विभागातील सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्त द्या, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार गायकवाड आयोगातील त्रुटी दूर करा आणि मराठा समाजाला मागास जाहीर करा.आरक्षणाचा टाईम बोर्ड द्या आदी मागण्या सरकारकडे करण्यात येणार आहेत.