प्रतिनिधी / धाराशिव
मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सुटल्यानंतर मुंबईपासून गाव खेड्यापर्यंत अभूतपूर्व जल्लोष सुरू झाला आहे.घरोघरी रांगोळी काढून, जागोजागी गुलालाची प्रचंड उधळण, फटाक्यांची आतषबाजी करून आणि एकमेकांना मिठाई भरून दिवाळी साजरी केली जात आहे. धाराशिव शहरात तसेच जिल्हाभरात आनंदोत्सव पाहायला मिळत आहे.
मनोज जरांगे-पाटील यांच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यापासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू असून, मराठा वादळ मुंबईत धडकल्यानंतर गेल्या दोन दिवसात या मागणीवर सकारात्मक चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री आणि या प्रश्नावर तोडगा निघाला आणि शनिवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाताने ज्यूस घेऊन मनोज पाटील यांनी आंदोलन मागे घेत गुलालाची उधळण केली. त्यानंतर राज्यभर अभुतपूर्व जल्लोष केला जात आहे.
धाराशिव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा तरुणांनी मोठा जल्लोष केला. त्यानंतर शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. यादरम्यान राजमाता जिजाऊ चौकातही फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो, एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देण्यात आल्या.
कळंब शहरात आनंदोत्सव
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने मनोज जरांगेंची नेतर्त्वखाली रवाना झालेल्या मराठ्यांच्या लढ्याला यश मिळाले असून, या निमित्ताने आज कळंब शहरात फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला. कळंब येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पुष्पहार अर्पण करून व सावरकर चौक येथे स्वा. सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विजयी जल्लोषात सहभागी होण्यासाठी कळंब शहारातून लाखो मराठा कार्यकर्ते मुंबई येथे रवाना झाले होते.
मराठा आरक्षण मागण्या मान्य ; आंदोलन विजयाचा वाशी येथे जल्लोष ;
डिजेच्या आवाजात गुलालाची उधळण
वाशी :- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागनीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मागील सात महिन्यांपासून सुरू केलेल्या आंदोलनाला शनिवारी यश मिळाले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशांचा आवाजात पेढे वाटून फटाके फोडत घरासमोर रांगोळी काढून मराठा समाजाने केला आनंद साजरा केला. मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्याची बातमी समाजमाध्यमावर व्हायरल होताच शहरातील युवकांनी चौक चौकात फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला.
ऐतिहासिक आंदोलनात वाशीचे योगदान
मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा दुसरा टप्पा १५ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झाला होता. दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याची सुरूवात शहरातील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या मैदानावरील ऐतिहासिक सभेने झाली होती. तालुक्यातील सकल मराठा समाजाने अत्यंत कष्ट घेत ही सभा यशस्वी केली. परिणामी शहर मराठा आरक्षण आंदोलनाच्या केंद्रस्थानी आले होते.