आरंभ मराठी / धाराशिव
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी स्थगित केलेला नियोजित दौरा उद्या सोमवारपासून पुन्हा सुरु होत आहे. ते सोमवारी धाराशिव शहरात येत आहेत. त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार असून, ते समाज बांधवांशी संवादही साधणार आहेत. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, पुढील दौऱ्यात त्यांच्या वाहनांच्या ताफ्यात धाराशिवमधील काही तरुण सहभागी होणार आहेत.
मराठा योद्धा मनोज पाटील यांनी बुधवारी येरमाळा येथे आल्यानंतर प्रकृती अस्वस्थ्यामुळे आपला पुढील दौरा स्थगित केला होता. दौरा रद्द करून ते उपचारासाठी छत्रपती संभाजी नगरकडे रवाना झाले होते. त्यानंतर त्यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानामध्ये सहभाग नोंदवून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले होते.
प्रकृती बरी झाल्यानंतर त्यांनी नियोजित दौरा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ते 30 तारखेला कर्नाटकातील बेळगाव येथील कार्यक्रमासाठी जाणार आहेत. यादरम्यान ते सोमवारी दुपारी बारा वाजता अंतरवाली सराटीतून प्रवासाला निघणार आहेत. सोमवारी दुपारी बीड, त्यानंतर सायंकाळी पाच वाजता धाराशिव येथे येणार आहेत. शहरातील सांजा चौकात त्यांचा मराठा समाजाच्या वतीने जंगी सत्कार करण्यात येणार आहे.त्यानंतर ते बांधवांसोबत संवाद साधतील. त्यानंतर ते पुढील दौऱ्यासाठी सोलापूरमार्गे सांगलीकडे रवाना होणार आहेत.
ताफ्यात तरुण सहभागी होणार
मनोज जरांगे पाटील यांच्या या दौऱ्यात धाराशिव जिल्ह्यातील काही तरुण सहभागी होणार आहेत. जरांगे पाटील यांचा सोमवारचा मुक्काम सांगली येथे असणार आहे.त्यानंतर ते कर्नाटकातील बेळगाव येथे जाणार आहेत.