कळंब येथे मराठा समाजाच्या नियोजन बैठकीला उस्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी / कळंब
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या मुंबई येथील आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर सकल मराठा समाज कळंब तालुक्याच्या वतीने नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. तालुक्यातून उस्फुर्तपणे मराठा समाजातील तरुणांनी या बैठकीला उपस्थिती होती.जरांगे पाटील यांच्या ताफ्यात कळंब येथील स्वयंसेवक मदतीला जातील असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
मुंबई येथील आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर दिनांक 15 जानेवारीपर्यंत तालुक्यात मॅरेथाॅन बैठका घेवुन पुढील आंदोलनाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच लाखो समाज बांधव मुंबई येथे दाखल होणार असल्याचे समन्वयकांकडुन सांगण्यात आले.
मनोज जरांगे-पाटील यांची आरक्षण दिंडी पुणे येथे दाखल झाल्यानंतर पुणे येथुन मुंबईपर्यंत या आरक्षण दिंडीत सहभागी होवुन मुंबईत ठाण मांडण्याचा या बैठकित एकमुखाने निर्णय घेण्यात आला.
आरक्षण दिंडीच्या सुरक्षिततेसाठी स्वयंसेवकांची तगडी फौज
कळंब तालुक्यातुन मुंबईच्या दिशेन जात असलेल्या हजारो आंदोलकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्वयंसेवकांची तगडी फौज तयार करण्यात आली आहे. यात वैद्यकीय मदत कक्ष,भोजन व्यवस्था कक्ष,आपत्कालीन कक्षाची बांधणी करुन यात प्रत्येकी 20 स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत.