एक एक रुपयांची ठेवली नोंद, शंकेला वाव नाही
आरंभ मराठी / धाराशिव
कोणत्याही सामाजिक चळवळीत आर्थिक भाग महत्वाचा असतो. समाजातून निधी गोळा करून ठराविक लोकांनी त्याचा फायदा घेतल्यानंतर चळवळीला ग्रहण लागते. गटबाजी निर्माण होऊन वादाचे प्रसंग उद्भवतात. मात्र, असे प्रसंग येणारच नाहीत, यासाठीची काळजी घेत धाराशिव तालुक्यातील सांजा गावाने पारदर्शकता जपली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर गावागावातून हजारो समाज बांधव मुंबईला आंदोलनासाठी रवाना झाले होते. सांजा गावातूनही शेकडो बांधव मुंबईच्या या आंदोलनात सहभागी झाले होते. मुंबईहून आल्यानंतर बांधवांनी जमा झालेल्या निधीचा सविस्तर तपशील समाजाला कळावा, यासाठी गावातील मुख्य चौकात डिजिटल फलक उभारला आहे.त्यावर खर्चाचा सविस्तर तपशील मांडला आहे.
कोणत्याही सामाजिक चळवळीसाठी अर्थकारण महत्त्वाचे असते वेगवेगळ्या समाजाच्या संघटना सामाजिक प्रश्नावर एकत्र येतात उपक्रमासाठी निधी जमा केला जातो मात्र काही संघटनांमध्ये या निधीवरूनच बेबनाव निर्माण होतो मात्र अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून धाराशिव तालुक्यातील सांजा गावाने गावात पारदर्शकता आणली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असून, या आंदोलनाचा भाग म्हणून 26 जानेवारी रोजी मुंबईला गेलेल्या गावातील मराठा बांधवांनी आल्यानंतर प्रवासात केलेल्या खर्चाचा तपशील गावातील मुख्य चौकातील डिजिटल फलकावर मांडला आहे.
सांजा गावातून सारोळ्याकडे जाताना हा फलक सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो. त्यावर मराठा समाज बांधवांनी मुंबईला जाण्यासाठी किती निधी दिला होता आणि किती खर्च झाला तसेच शिल्लक रक्कम किती राहिले, याचा तपशील लिहिला आहे.
मराठा समाजाच्या वतीने अजूनही आंदोलन सुरूच आहे. गेल्या आठवड्यात सांजा येथील मराठा बांधवांनी पुढाकार घेऊन धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अचानक उग्र आंदोलन उभे केले होते. या आंदोलनाला व्यापक स्वरूप मिळाले होते. आंदोलनातील वेगवेगळे टप्पे पार करत असताना गावकऱ्यांनी पारदर्शकता जपली आहे. यावेळच्या मराठा आंदोलनाचे वैशिष्ट्य हेच असून, त्यामुळेच आंदोलन एकसंघपणे टिकून राहिले.
आंदोलनासाठी सामान्य मराठ्यांची मदत
मराठा आरक्षणासाठी 2017 पासून राज्यात वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन सुरू आहे सुरुवातीला मूक मोर्चा त्यानंतर ठोक मोर्चा काढण्यात आला, संपूर्ण जगाने या आंदोलनाच्या दोन्ही बाजू अनुभवल्या.आता सात महिन्यापासून राज्यात उपोषणासह रस्ता रोको आंदोलन केले जात आहे.
वास्तविक पाहता या आंदोलनासाठी प्रचंड प्रमाणात पैशांची गरज लागली असणार. मात्र समाजातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळत असून, समाजातील दानशूर व्यक्ती भरभरून योगदान देत आहेत.निधीअभावी आंदोलन थांबले असे होत नाही. विशेष म्हणजे प्रस्थापित नेत्यांनी, घराण्यांनी आंदोलनाला बगल दिली आहे. मात्र, कष्टकरी, कामगार,शेतकरी, व्यापारी, नोकरदार, अधिकारी वर्ग या आंदोलनाला आर्थिक मदत करत आहे.