मराठा आंदोलन; जिल्ह्यात जागोजागी रास्ता रोको,मराठा मंत्री,खासदार, आमदारांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला
प्रतिनिधी / धाराशिव
मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होताना दिसत आहे. मंगळवारी धाराशिव जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.सोमवारी पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना राजीनामा मागणाऱ्या समाजबांधवांनी आता खासदार-आमदारांवर राजीनामा द्यावा, यासाठी दबाव वाढविला असून, त्यांना जिल्ह्यात फिरू न देण्याचा इशारा दिला आहे.त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस अडचणींचा ठरू लागला आहे.तुळजापुरात कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करून सरकारने मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली तसेच तुळजाभवानी मातेला आरती करून सरकारला सद्बुद्धी दे,अशी प्रार्थना केली.
मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग दोन तास अडवून धरल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती तसेच ढोकी-कळंब रस्त्यावर देवळाली येथे बराच वेळ आंदोलन करण्यात आले. मराठा आंदोलकांनी यापुढे मंत्री तसेच खासदार-आमदारांना रस्त्यावर न फिरू देण्याचा इशारा दिला असून, मराठा मंत्री, खासदार-आमदारांनी आरक्षणासाठी राजीनामा द्यावा, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.
धाराशिव शहरात सोमवारी मराठा आंदोलकांच्या भेटीसाठी आल्यानंतर तरुणांनी पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांना राजीनामा देणार का, असा सवाल केला आणि प्रचंड घोषणाबाजी झाली. मराठा आंदोलकाकडून जागोजागी असाच अनुभव येऊ लागला आहे. मंगळवारी देखील शहरात तसेच ग्रामीण भागात आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले. धाराशिव तालुक्यातील आळणी फाटा येथे धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी खासदार-आमदारांना जिल्ह्यात न फिरू देण्याचा इशारा दिला. यादरम्यान वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती तर याकाळात एका रुग्णवाहिकेला आंदोलकांनी वाट करून दिली. तसेच ढोकी येथील आंदोलकांना तसेच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कळंब-ढोकी मार्गावर देवळाली येथे रास्ता रोको करण्यात आला.
ढोकी येथे प्रमोद देशमुख, संग्राम देशमुख, सतीश वाकुरे(ढोकी), प्रज्वल हुंबे,मुकेश जाधव(देवळाली), शिवाजी बेडके (गोवर्धनवाडी), जीवन कावळे(कावळेवाडी), किशोर शेंडगे(तुगाव) यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मंगळवारी त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी सकल मराठा समाजाच्या वतीने कळंब तालुक्यातील देवळालीपाटी येथे चक्काजाम आंदोलन केले. यावेळी दोन तास आंदोलकानी कळंब – ढोकी मार्ग रोखून धरला.यावेळी वाहतूकीची कोंडी झाली होती. चक्काजाम अंदोलनादरम्यान येणाऱ्या रुग्णवाहिकांना मराठा स्वयंसेवक वाट मोकळी करून दिली. यावेळी मागण्याचे निवेदन आंदोलकाच्या वतीने मंडळाधिकारी अश्विनी निंबाळकर यांनी स्वीकारले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ढोकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर यांनी चोख बंदोबस्त लावला होता.दरम्यान, उपोषणकर्त्यांची सुधीर पाटील व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांनी भेट घेतली.विविध राजकीय, सामाजिक संघटनेकडून उपोषणाकर्त्याना पाठबळ मिळत आहे. यापूर्वीच खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. राणाजगजितसिंह पाटील,आ. कैलास पाटील यांनी उपोषणकर्त्याची भेट घेतली होती.
रुईभर पाटीवर 1 वाजेपर्यंत रास्ता रोको
मराठा आरक्षणासाठी धाराशिव तालुक्यातील रुईभर पाटीवर सकाळी 10 वाजेपासून दुपारी 1 वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. येडशी येथे धरणे आंदोलन सुरू असून, आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन देऊन आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली आहे.