प्रतिनिधी / धाराशिव
जिल्ह्यातील मराठा समाजातील नागरिकांना प्रशासकीय किंवा अन्य कामानिमित्त धाराशिव शहरात आल्यानंतर त्यांची सोय व्हावी तसेच गरजूंना कार्यालयीन माहिती मिळावी, निवासाची सोय उपलब्ध व्हावी, गरीब विद्यार्थ्यांना सुविधा मिळाव्यात, यासाठी धाराशिव शहरात सुसज्ज असे मराठा भवन उभे करावे,अशी मागणी भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्याकडे करण्यात आली आहे.यावेळी पालकमंत्री डॉ. सावंत यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाकडून तातडीने शहर विकास आराखड्याची मागणी केली आणि मराठा भवन उभारण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली.
यासंदर्भात पालकमंत्री डॉ.सावंत यांना महासंघाच्या वतीने रविवारी सकाळी निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील मराठा समाजातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी हक्काचे ठिकाण म्हणून मराठा भवन आवश्यक असून, प्रशासकीय पातळीवर कामे,गरीब विद्यार्थ्यांना निवास व्यवस्था,अभ्यासासाठी सोय असलेली सुसज्ज वास्तू गरजेची आहे.त्यासाठी शासनाने शहरात पालिकेच्या हद्दीतील मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध करून अद्ययावत असे आण्णासाहेब पाटील मराठा भवन उभे करावे तसेच पंजाबराव देशमुख मराठा वसतीगृहासाठी शहरात वाढीव जागा देण्यात यावी,अण्णासाहेब पाटील महामंडळाची दर महिन्याला आढावा बैठक घेऊन मराठा समाजाच्या महामंडळात रखडलेल्या मराठा बांधवाचे प्रकरणे मार्गी लावण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर महासंघाचे जिल्हाध्यक्ष संकेत सूर्यवंशी, प्रवक्ते खंडू राऊत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके ,ऍड.विश्वजीत शिंदे आदी उपस्थित होते.
विस्तारित हवे वसतिगृह
मराठा समाजातील मुलांसाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र ,त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी होत नाही. मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची गरज आहे, मात्र सध्या मुलांसाठी असलेले वसतिगृह अपुरे असून, त्यासाठी विस्तारित इमारतीची गरज आहे. सध्याची इमारत उसनवारीवर आहे.