आरंभ मराठी / जालना / धाराशिव
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या शिष्टमंडळात सोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आपले आंदोलन गुरुवारी स्थगित केले. मनोज पाटील यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करून राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने यशस्वी शिष्टाई केली. या शिष्टमंडळामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई तसेच तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील, बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा समावेश होता. उपोषण स्थगित केल्यानंतर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मनोज जरांगे-पाटील यांना तुळजाभवानी मातेची कवड्याची माळ घातली.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे 6 दिवसांपासून उपोषण सुरू होते. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला होता.तसेच त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी तीन दिवसांपासून मनोज जरांगे आणि राज्य सरकारमध्ये सकारात्मक चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. अखेर बुधवारी सायंकाळी तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील, औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन उपोषणावर तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून शंभूराजे देसाई तसेच आमदार राणा पाटील, आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शिष्टमंडळाला आज अंतरवाली सराटीमध्ये जाऊन चर्चा करण्याची सूचना केली. त्यानुसार दुपारी शंभूराजे देसाई,खासदार संदीपान भुमरे, आमदार राणा जगजीतसिंह पाटील, आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शिष्टमंडळाने मनोज पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या मागण्या समोर ठेवल्या. तसेच 30 जूनपर्यंत मागण्या मान्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. मात्र शंभूराज देसाई यांनी एक महिन्याची मुदत मागितल्याने जरांगे यांनी एक महिन्याची मुदत देऊन आपले उपोषण स्थगित केले. सहा दिवसांपासून सुरू असलेले जरांगे पाटील यांचे उपोषण तूर्त थांबल्याने मराठा समाज बांधवातून समाधान व्यक्त होत आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालल्याने चिंता व्यक्त केली जात होती. दरम्यान राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला शिष्टाई करण्यात यश आल्याने समाधान व्यक्त होत आहे. पाणी घेऊन जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर आई तुळजाभवानीचे आशीर्वाद कायम सोबत राहावेत, म्हणून आमदार राणा पाटील यांनी जरांगे पाटील यांच्या गळ्यात कवड्याची माळ गळ्यात घातली.त्यानंतर जय भवानी,जय शिवराय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
राऊतांनी अंतरवाली तर राणा पाटलांनी मुंबईतून केला पाठपुरावा
मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या अंदोलानात सरकारला मध्यस्थी साधण्यात यश मिळाले. मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वात सरकारच्या शिष्टमंडळ सोबत झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित केले आहे. तुळजापुरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मराठा आरक्षणावर लवकर निर्णय घेण्याबाबत चर्चा केली होती.