मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार, उमरगा येथील सभेला लाखोंचा जनसागर
प्रतिनिधी / उमरगा
मराठा आरक्षणावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक व्यापक होईल. सरकारने दिलेल्या मुदतीनुसार आम्ही 24 डिसेंबरची प्रतीक्षा करत आहोत. मुदतीत आरक्षण न मिळाल्यास आंदोलनाची पुढील दिशा कशी असावी यावर निर्णय घेण्यासाठी 17 डिसेंबरला अंतरवाली सराटी येथे बैठक आयोजित करण्यात आली असून,या बैठकीत निर्णय जाहीर करू, सरकारने कितीही डाव टाकले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच असा निर्धार मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
रविवारी रात्री उमरगा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या कै शिवाजीराव मोरे क्रीडा संकुलावर विराट जाहीर सभेत ते बोलत होते. जरांगे- पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्यात आला आहे.लढ्याला तुमचा असाच पाठिंबा राहू द्या. राज्यात ३५ लाख व्यक्तींचे कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र सापडल्याने आता मराठ्यांचा ओबीसीत समावेश अंतिम टप्प्यात आहे. माझी तब्येत साथ देत नाही, मला विश्रांतीसाठी थांबता पण येत नाही. थांबलो तर मराठ्यांच्या लेकरांचे वाटोळे होणार आहे.
मराठा ही जात जगाच्या पाठीवर शांत आहे. मात्र एखाद्याच्या पाठीमागे लागले तर शांत बसणार नाही.मराठा आरक्षणासाठी ज्यांचे बळी गेले त्याला राज्य सरकार जबाबदार असून सकल मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान सबंध राज्यात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्व गुन्हे राज्याचे गृहमंत्री माघार घेणार आहेत. मराठा समाजाने एकजुटीने आरक्षण समजून घ्या. आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्यात आली आहे. शासनाने कितीही डाव टाकू द्या ते उधळूनच लावू. जीव गेला तरी बेहत्तर मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सरकार मराठा आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तुम्ही गाफील राहू नका. मराठे रागीट असल्याने उचकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण तुम्ही शांत रहा. उद्रेक व जाळपोळ करू नका. यांच्या छाताडावर बसून आपण आरक्षण घेऊ, चार वर्षात ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण १४ टक्क्यांवरून ३२ टक्के कसे झाले ? त्यासाठी कोणत्या समितीने शिफारस केली होती, याचे उत्तर सरकार त्यांचे शिष्टमंडळ आणि अधिकारी देत नाहीत. १६ टक्के आरक्षण मराठ्यांच्या हक्काचे असून ते देऊन टाका आणि हा प्रश्न कायमचा संपवा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
गरिबांचा तळतळाट, म्हणून भुजबळ जेलमध्ये
मराठा आरक्षणाला विरोध करणारे मंत्री छगन भुजबळांवर जरांगे पाटील यांनी टिकास्त्र सोडले. भ्रष्टाचारामुळे गोरगरिबांच्या तळतळाट लागल्याने भूजबळांनी जेलवारी केली आहे, माझ्या शिक्षणावर व अभ्यासावर बोलू नये. मला संविधानाचा अभ्यास आहे. जाती, जातीत गैरसमज करून मराठ्यांचं आरक्षण रोखण्याचं भूजबळांच स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. एकदा आरक्षण मिळू द्या, मग येवल्याची आणि माझी गाठ आहे. उपजातींचा ओबीसीत समावेश करुन शासनाने मराठा समाजाची खिल्ली उडवली आहे. ओबीसी आरक्षण २८ हून ३२ टक्क्यांवरती पोहचले, मात्र त्यास कुठलाही आधार नाही. देशात एकमेव मराठा जात अशी आहे, मराठा कुणबी असल्याचे पुरावे सापडले आहेत.
मराठ्यांना अंगावर घेऊ नका
आग्यामोहोळ सध्या शांत आहे, उठले तर पळता भुई थोडी होईल, मराठ्यांना अंगावर घेऊ नका, त्यांच्या विरोधात जाऊ नका, समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी घराचा उंबरा शिवणार नाही, मराठा समाजाने १०६ आमदार तुम्हाला दिले, तुम्ही हे विसरू नये. धडा शिकवू, अजितदादा तुमच्या नेत्याला आवरा असा इशारा ही दिला.
१०१ जेसीबीने फुलांची उधळण
मनोज जरांगे पाटील यांचे उमरगा शहरात आगमन झाल्यानंतर त्यांचा ५०० किलो वजनाचा २० फुट उंचीचा हार क्रेनच्या साहाय्याने घालून भव्य स्वागत करण्यात आले. तद्नंतर जरांगे पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. दोन किलोमीटर अंतर १०१ जेसीबीमधून फुलांचा वर्षाव करण्यात आला.जरांगे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आगमन होताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले.