आरंभ मराठी / परंडा
महाविकास आघाडीमध्ये अनपेक्षितपणे माजी आमदार राहूल मोटे यांना धक्का देण्यात आला आहे.शिवसेना उबाठा गटाने भूम-परंडा विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार स्व.ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.या उमेदवारीमुळे तीनवेळा आमदार राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राहूल मोटे यांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीमध्ये द्वंद्व निर्माण होणार हे नक्की. मात्र,शिवसेनेची यादी चुकून प्रसिद्ध झाली असून, नावात बदल होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते सांगत आहेत.
काही दिवसांपूर्वीच म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे अकाली निधन झाल्यामुळे मतदारसंघात त्यांच्याबद्दल मोठी भावनिक लाट निर्माण झाली आहे. शिवसैनिकांनी ही जागा शिवसेना उबाठा गटाला सुटावी,यासाठी मुंबईत मातोश्रीवर जोरदार प्रयत्न सुरु केले होते. काही दिवसांपूर्वीच शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाऊन याबाबत ठाकरे यांची भेट घेऊन रणजित पाटील यांच्या तिकीटाची मागणी केली.
तर इकडे माजी आमदार राहुल मोटे यांनी देखील पक्षश्रेष्ठींकडे तगडी फिल्डिंग लावली होती. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना (उबाठा) हे दोन्ही गट जागा आमच्या पक्षाची आहे, असा दावा करत होते. त्यामुळे महाविकास आघाडीत रणजित पाटील व राहुल मोटे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसत होते. परंडा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झालेली असताना शिवसेनेने अचानकपणे माजी आमदार स्व.ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने दोन शिवसेनेत सामना होणार हे निश्चित झाले आहे.
राहूल मोटे कोणती भूमिका घेणार ?
परंडा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून प्रविण रणबागुल यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. रासपकडून डॉ. राहुल घुले यांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होईल. मात्र, महाविकास आघाडीकडून तीनवेळा आमदार राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राहुल मोटे उमेदवार असतील अशी शक्यता असतानाच रणजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याने राहूल मोटेंना मोठा धक्का मानला जात आहे. आता राहूल मोटे कोणती भूमिका घेतात,याकडे लक्ष लागले आहे.