कोथींबीर झाली मातीमोल; उत्पादन खर्चही निघेना
अमोलसिंह चंदेल । शिराढोण
शेतमालाची जरा कुठे भाववाढ झाली की महागाईच्या नावाखाली गळे काढले जातात. महिनाभर टोमॅटोचे दर काही प्रमाणात वाढले होते. त्यावर अनेक विचारवंतांनी वैचारिक मंथन केले. मात्र, काही दिवसातच टोमॅटोचे भाव घसरले आणि शेतकऱ्यांना मिळणारे समाधान अत्यल्प ठरले. मात्र आता कोथिंबीर मातीमोल झाली असून, भाव मिळत नसल्याने आणि बाजारपेठेत मालाला उठाव नसल्याने शेतकऱ्यांनी मोडून टाकायला सुरुवात केली आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याबद्दल मात्र कोणीही शब्द काढायला तयार नाही.
भाव मिळत नसल्याने कळंब तालुक्यातील शिराढोण परिसरातील शेतक-यांनी 100 एकरहून अधिक क्षेत्रातील कोथिंबीर काढून टाकली आहे. बहुतांश शेतकरी आता शेतातील कोथिंबीर पिकात रोटावेटर करत आहेत. त्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीस फाटा देत प्रयोगशिल शेती करण्याच्या उद्देशाने कोथींबीर शेती निवडली. परिसरात शेतक-यांनी त्यांचा समुह करुन शंभराच्या वर शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात कोथींबीर लागवडीस सुरूवात केली. सुरूवातीला कोथींबीरीतून चांगले उत्पन्नही मिळू लागले. परंतू आता मात्र या कोथींबीरीला कवडीमोल भाव मिळत आहे. व्यापारीही कोथींबीर घेवून जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे निराश झालेल्या शिराढोण परिसरातील शेकडो शेतक-यांनी जवळपास 100 एकरच्यावर कोथींबीर शेतीवर नांगर फिरवला आहे.
आता भरपाई कशी मिळणार..?
शेतमालाला भाव मिळत नाही, 2020 पासून शेतकऱ्यांची विमा, अनुदानाची रक्कम प्रलंबित आहे. सध्या पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत भाजीपाल्याचे भाव कोसळले आहेत. कोथिंबीर पिकासाठी लागवड आणि जोपासना करण्यासाठी एकरी किमान 30 ते 40 हजरांचा खर्च होतो.पण भाव नसल्याने बियाणे, टाॅनीक, फवारण्या करुन शेतक-यांनी फुलवलेली कोथींबीर नष्ट करण्याची वेळ आली आहे.आता भरपाई कुणाकडे मागायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाव मिळेना,70 हजार खर्च वाया गेला
माझ्या शेतात दोन एकर कोथींबीरीची लागवड केली होती. चांगले उत्पन्न होईल, या अपेक्षेने कोथींबीर शेतीसाठी 70 हजार रुपये खर्च केले.मात्र स्वप्न मातीमोल ठरले. सध्या कोथींबीरीला भावच नसल्याने व्यापारी कोथींबीर घेवून जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे हाताशी आलेल्या कोथिंबीरीचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे कोथींबीरीच्या शेतात रोटावेटर करुन टाकले.
ओंकार बाबूराव टेळे, शेतकरी, शिराढोण.